नवी दिल्ली : केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवरून महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शरद पवार एक अनुभवी राजकारणी आहेत आणि माजी केंद्रीय कृषीमंत्रीही आहेत. शेतीशी निगडीत मुद्दे आणि निराकरण याची शरद पवार यांना उत्तम माहिती आहे, असे नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.
शरद पवार यापूर्वी कृषी कायद्याचे समर्थक होते. त्यासाठी त्यांनी खूप मेहनतही घेतली होती. मात्र, आता शरद पवार ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत, ते पाहून मला आश्चर्य वाटत आहे. सर्व काही माहिती असूनही शरद पवारांसारखे अनुभवी नेते शेतकऱ्यांसमोर चुकीच्या पद्धतीने तथ्य मांडत आहेत, असा दावा नरेंद्र सिंह तोमर यांनी केला.
शरद पवार भूमिका बदलतील
शरद पवार यांच्याकडे आता योग्य माहिती आली आहे. त्यामुळे ते यापुढे आपली भूमिका बदलतील आणि देशातील शेतकऱ्यांना कृषी कायद्याचे फायदे आणि लाभ सांगतील, असा मला विश्वास आहे, असेही तोमर यांनी म्हटले आहे.
"सोनार बांगलासाठी आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे"; राजीव बॅनर्जी
कृषी कायद्यांचा बाजार समित्यांवर परिणाम नाही
नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपला माल कोणालाही आणि कुठेही विकण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. आपल्या राज्याबाहेर शेतकऱ्यांना माल विकता येणार असून, त्याची त्यांना चांगली किंमतही मिळेल. सध्याच्या किमान आधारभूत किंमत व्यवस्थेवर याचा परिणाम होणार नाही. नवीन कृषी कायद्यांमुळे बाजार समित्यांवरही परिणाम होणार नाही. याउलट, अधिक स्पर्धा निर्माण होईल तसेच सेवा आणि पायाभूत सुविधा निर्माण होतील. यामुळे दोन्हीही व्यवस्था कायम राहतील, असेही तोमर यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय कृषी कायद्यांवर शरद पवार यांनी शनिवारी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बाजार समित्या यांची व्यवस्था नवीन कृषी कायद्यांमुळे कमकुवत होईल, असा दावा शरद पवार यांनी केला. आमच्या कार्यकाळात विशेष बाजार समित्या स्थापन करण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला होता, जेणेकरून शेतकरी आपले उत्पादन आणि तयार शेतमाल विकण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळू शकेल आणि शेतकरी हितासाठी आताची बाजार प्रणाली मजबूत करण्यासाठी आमच्याकडून सावधगिरी बाळगण्यात आली, असेही शरद पवार यांनी सांगितले.