नवी दिल्ली - पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भाजपालापंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसला. तसेच निवडणुकीत भाजपाच्या झालेल्या दारूण पराभवावर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं आहे. निवडणूक निकालाचा संबंध शेतकर्यांच्या आंदोलनाशी जोडणं चुकीचं आहे. पंजाबमध्ये आमची स्थिती कमकुवत होती असं म्हणत यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे.
"आम्ही याआधी अकाली दलाबरोबर युती करून निवडणुका लढवायचो. पण आम्ही यावेळी स्वबळावर निवडणूक लढवली असून यामुळे निवडणुकीत पक्षाचं नुकसान झालं आहे" असं नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं. यासोबतच त्यांनी आसाममधील विधानसभा निवडणुकांसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला देखील उत्तर दिलं आहे. "आसाममधील जनमत सरकारच्या बाजूने आहे. राज्यात प्रो इनकंबेन्सी आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपा अधिक जागा जिंकेल. मागील सरकारमध्ये जे घडलं ते आसामच्या जनतेने पाहिलं आहे. तसेच भ्रष्टाचार शिगेला पोचला होता. विकासाचा पत्ताच नव्हता आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट होती."
"आसाममधील जनमत सरकारच्या बाजूने, पुन्हा भाजपाचा विजय होणार"
"आसाममध्ये अँटी इनकंबेन्सीऐवजी प्रो-इनकंबेन्सी पाहायला मिळत आहे. हे भाजपासाठी एक चांगलं चिन्ह आहे आणि आशा आहे की भाजपा पुन्हा सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल" असा दावा तोमर यांनी केला आहे. आसामचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या पाच वर्षे जनतेची सेवा केली आहे. आसाममध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था स्थापन झाली आहे. त्यांनी विकासाला प्राधान्य दिलं आहे असं नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं. पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने राज्यात मोठा विजय मिळवला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भाजपाच्या नाकी नऊ! सनी देओलच्या मतदारसंघात उमेदवाराला बसला मोठा धक्का, मिळाली फक्त 9 मतं
भाजपा खासदारसनी देओल (Sunny Deol) यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला असून नाकी नऊ आले आहेत. सनी देओल यांचा मतदारसंघ असणाऱ्या गुरुदासपूरमध्ये भाजपाच्या उमेदवाराला फक्त नऊ मतं मिळाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुदासपूर नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12 मधून भाजपाच्या किरण कौर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र त्यांना अवघी नऊ मतं मिळाली आहेत. यामुळेच संतप्त झालेल्या किरण कौर यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच माझ्या घरातच 15 ते 20 मतदार आहेत. या सर्वांनी मला मत दिलं होतं. तरी देखील फक्त 9 मतं कशी पडली असा सवाल विचारत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.