लखनऊ : समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर न पाठवल्यामुळे नाराज झालेल्या नरेश अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत अग्रवाल यांनी भाजपाचं सदस्यत्व घेतलं. समाजवादी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी जया बच्चन यांची पक्षाच्या राज्यसभेच्या उमेदवार म्हणून घोषणा केली होती. राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने आणि अखिलेश यादव यांनी जया बच्चन यांच्यासाठी तिकीट कापल्यामुळे अग्रवाल नाराज होते. त्यामुळे ते पक्ष सोडून भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. भाजपात प्रवेश केल्यानंतर नरेश अग्रवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी आज भाजपात प्रवेश करत आहे. राष्ट्रीय पक्षामध्ये न राहता देशासमोर स्वतःची भूमिका ठेवता येणार नाही असं ते म्हणाले. तसंच समाजवादी पक्षाविरोधात राग व्यक्त करताना सिनेमामध्ये नाचणा-यांसाठी माझं तिकीट कापण्यात आल्याचं म्हटलं. माझा समाज आधीपासूनच भाजपासोबत होता त्यामुळे या निर्णयाने ते नक्कीच आनंदी असतील. मी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आभार मानतो असं ते म्हणाले. समाजवादी पक्षाने नरेश अग्रवाल आणि किरणमय नंदा यांना डावलून जया बच्चन यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी दिली होती. दुसरीकडे, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नरेश अग्रवाल यांचं स्वागत केलं आहे पण त्याचसोबत त्यांनी जया बच्चन यांच्याबाबत केलेल्या टीकेचं कधीही समर्थन होऊ शकत नाही असंही स्पष्ट केलं आहे.
नरेश अग्रवाल भाजपामध्ये, म्हणाले...सिनेमात नाचणा-यांसाठी माझं तिकीट कापलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 5:35 PM