नरेश अग्रवाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणाला नवं वळण मिळालं आहे. समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर न पाठवल्यामुळे नाराज झालेल्या अग्रवाल यांनी काल(दि. 13) भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपाचं सदस्यत्व घेतलं. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी अग्रवाल यांच्या भाजपाप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. नरेश अग्रवाल यांच्या जाण्याने पक्षाचं कोणतंही नुकसान होणार नाही उलट त्यांच्या जाण्याने फायदाच होईल असं मुलायम म्हणाले आहेत.
सिनेमात नाचणा-यांसाठी माझं तिकीट कापलं - नरेश अग्रवालकाही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी जया बच्चन यांची पक्षाच्या राज्यसभेच्या उमेदवार म्हणून घोषणा केली होती. राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने आणि अखिलेश यादव यांनी जया बच्चन यांच्यासाठी तिकीट कापल्यामुळे अग्रवाल नाराज होते. त्यामुळे ते पक्ष सोडून भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. भाजपात प्रवेश केल्यानंतर नरेश अग्रवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी आज भाजपात प्रवेश करत आहे. राष्ट्रीय पक्षामध्ये न राहता देशासमोर स्वतःची भूमिका ठेवता येणार नाही असं ते म्हणाले. तसंच समाजवादी पक्षाविरोधात राग व्यक्त करताना सिनेमामध्ये नाचणा-यांसाठी माझं तिकीट कापण्यात आल्याचं म्हटलं. माझा समाज आधीपासूनच भाजपासोबत होता त्यामुळे या निर्णयाने ते नक्कीच आनंदी असतील. मी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आभार मानतो असं ते म्हणाले. अग्रवाल यांनी व्यक्त केला खेद -जया बच्चन यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. चौफेर टीका झाल्यानंतर अग्रवाल यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ''माझ्या विधानामुळे कोणापुढे कोणतीही समस्या निर्माण झाली असल्यास मी त्याबाबत खेद व्यक्त करतो. समाजवादी पार्टीला मला तिकीट देणं योग्य वाटले नाही आणि त्यांनी जया यांना तिकीट दिलं. मला कोणत्याही वादामध्ये अडकायचे नाही आणि मी केलेल्या विधानाप्रकरणी खेद व्यक्त करतो''. ''माझ्या विधानाचा प्रसिद्धी माध्यमांनी वेगळ्या पद्धतीनं दाखवलं. मला कोणाला दुःख पोहोचवण्याचा हेतू नव्हता. मी माझे शब्द मागे घेतो'',असे पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी म्हटले आहे.