ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - स्त्रीशक्ती, स्त्रीयांचा आदर यावर मोठमोठी भाषणं ठोकून टाळ्या मिळवणारी नेतेमंडळी आपण नेहमीच बघतो. पण दिल्लीतील महिला व बालविकास मंत्री संदीप कुमार हे गेल्या चार वर्षांपासून प्रत्यक्ष कृतीतून नारी शक्तीला सलाम करत आहेत. संदीप कुमार हे दररोज सकाळी पत्नीचे पाया पडतात. पत्नीने माझ्यासाठी तिच्या स्वप्नांना तिलांजली दिली व यासाठी मी तिचे पाया पडतो असे संदीप कुमार यांचे म्हणणे आहे.
महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दिल्लीचे महिला व बालविकास मंत्री संदीप कुमार यांनी दररोज पत्नीचे पाया पडतो अशी जाहीर कबुली दिली. विशेष म्हणजे संदीप कुमार यांचा जन्म हरियाणात झाला असून हरियाणातील पुरुषी मानसिकता सर्वश्रृत आहे. जाहीर कार्यक्रमात संदीप कुमार यांनी ही कबुली दिल्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले. संदीप कुमार यांची ही कृती दिल्लीकरांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
संदीप कुमार व त्यांची पत्नी रितू यांचा प्रेमविवाह आहे. २०११ मध्ये संदीप व रितू विवाहबंधनात अडकले. संदीप व रितू हे एकाच महाविद्यालयात शिकत होते व तब्बल ८ वर्ष त्यांचे प्रेमसंबंध होते. आमच्या लग्नाला प्रखर विरोध होत होता पण हा विरोध झुगारुन आम्ही लग्न केले अशी आठवण रितू यांनी सांगितली. लग्नापूर्वी मी आई वडिलांचे पाया पडायचो, त्यांनी मला या जगात आणले यासाठी मी त्यांचे आभार मानायचो. पण लग्नानंतर रितूने मला मोलाची साथ दिली, माझ्यासाठी तिनेही ब-याच गोष्टींचा त्याग केला याची जाणीव मला झाली व मग मी तिचेही पाया पडू लागलो असे संदीप कुमार सांगतात.
संदीप कुमार यांनी जाहीर कार्यक्रमात ही कबुली दिल्यावर त्यांच्यावर कौतुक होत आहे. पण दुसरीकडे त्यांना विरोधाचा सामनाही करावा लागतो. काही जण फोन करुन पुरुषांचे वर्चस्व असलेल्या समाजात मी असे विधान कसे करु शकतो असा सवाल विचारतात, तर एका नातेवाईकाने या विधानाने तू कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का दिला अशा शब्दात विरोध दर्शवला असे संदीप कुमार नमूद करतात.