रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कसुरेंद्रनगर : नर्मदेच्या पाण्याचा सर्वाधिक लाभ सुरेंद्रनगर जिल्ह्याला झाल्याचा दावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असला, तरी जिल्ह्यातील अनेक भाग आजही दुष्काळाचे चटके सोसत असल्याने त्या गावांमध्ये ‘विकास नही पाणी जोईए’ असाच नारा घुमताना दिसत आहे.
जिनिंग आणि मिठासाठी प्रसिद्ध असलेल्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१७च्या निवडणुकीत येथे पाचपैकी चार ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र, त्यापैकी दोघांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला व पोटनिवडणुकीत त्यांना पुन्हा विजयी करून येथे भाजपने आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिल्ह्यात दोन सभा झाल्या आहेत. त्यांनी सरदार सरोवर प्रकल्पाद्वारे नर्मदेचे पाणी आणले असून, त्याचा सर्वाधिक लाभ सुरेंद्रनगर जिल्ह्यालाच झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टीचे प्रमुख केजरीवाल यांनी पाण्याचा दावा खोटा असल्याचा आरोप केला आहे. तर पाणीवाटपात राजकारण केले जात असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे.
पाण्याच्या मुद्द्यावर जनताही आक्रमकजिल्ह्यातील काही गावांमध्येदेखील पाण्याच्या मुद्द्यावर जनता आक्रमक होताना दिसत आहे. ‘आमने विकास नथी पाणी जोईए...’ अशा प्रतिक्रिया खोडू (ता. वढवान) या गावात ऐकायला मिळाल्या. हे गाव पूर्वी पाण्यासाठी समृद्ध मानले जात होते. १९८६-८७मध्ये जिल्ह्यात सर्वात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी जिल्ह्यातील सुरेंद्रनगर शहरासह ५० गावांना या गावाने पिण्याचे पाणी दिले. मात्र, आज या परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेल्याने येथील शेती कोरडवाहू झाली आहे. या निवडणुकीत त्यासाठी ३१ गावांचे सरपंच एकत्र आले असून, त्यांनी पाण्यासाठी सरकारविरोधातच आंदोलन सुरू केले आहे.
प्रचारात ‘पाणी’लीमडी तालुक्यातील सायला गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून तेथे आठ दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे तर चोटीला मतदार संघातील आनंदपूर व परिसरातील गावांना पाण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागते. हाच प्रश्न काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या प्रचाराचा मुद्दा बनला आहे.