आजचा दिवस भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्वाचा ठरणार आहे. चंद्रयान ३ आज चंद्राच्या काळोख्या बाजुला उतरणार आहे, ही जागा जगापासून लपून राहिलेली आहे. आजवर भारतासह अन्य देशांनी पृथ्वीकडील प्रकाशमान भागावरच यान उतरविलेली आहेत. अशातच चंद्रयान २ चे अपयश आणि परवाच रशियाच्या लुना २५ चे अपयश यामुळे सर्वांच्या मनात धाकधुक आहे. या पार्श्वभुमीवर अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि युरोपची अंतराळ संस्था इसा या इस्त्रोच्या मदतीला धावले आहेत.
चंद्रयान -३ आज सायंकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. जेव्हापासून चंद्रयान- अवकाशात झेपावले आहे, तेव्हापासून या दोन्ही एजन्सी भारताला ट्रॅकिंगसाठी मदत करत आहेत. आजही नासा लँडिंगवेळी इस्त्रोला मदत करणार आहे.
नासाचे स्वतःचे मोठे अंतराळ नेटवर्क आहे. त्यांनी जगाच्या विविध कानाकोपऱ्यात प्रचंड मोठे रेडिओ अँटेना लावले आहेत. ESA चे स्वतःचे आंतरराष्ट्रीय उपग्रह ट्रॅकिंग नेटवर्क आहे, ज्याला ASTRAC म्हणतात. ASTRAC ही ग्राउंड स्टेशन्सची एक जागतिक प्रणाली आहे जी कक्षेमधील उपग्रह आणि जर्मनीतील डार्मस्टॅडमधील युरोपियन स्पेस ऑपरेशन्स सेंटर दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करते. कोर ESTRACE नेटवर्कमध्ये सात देशांतील सात स्थानके आहेत. इस्त्रोच्या या अँटेनाच्या कव्हरेजबाहेर जर उपग्रह, यान गेले तर याच दोन संस्थांची मदत घेतली जाते.
लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावरील ऑपरेशन्समध्ये सपोर्ट केला जाईल, रोव्हरचा डेटा सुरक्षितपणे भारतातील इस्रोकडे प्रसारित केला जाईल, असे इसाने सांगितले. कर्नाटकातील ब्यालालू या गावात इस्रोचे स्पेस ट्रॅकिंग स्टेशन आहे. अमेरिका आणि युरोपमधून लँडर विक्रम आणि चंद्रयानाचा डेटा इकडे पाठविला जाणार आहे.