Nasa praises India Space Program: भारताने चांद्रयान-३ चे ही मोहिम यशस्वी केली आणि जगात एक वेगळी ओळख प्रस्थापित केली. अंतराळ क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचे जगात कौतुक होऊ लागले आहे. नासाचे माजी अंतराळवीर स्टीव्ह ली स्मिथ (Steve Lee Smith ) यांनी नुकतेच भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले आहे. स्मिथ म्हणाले की, भारताने असा पराक्रम करून दाखवला जो इतर कोणत्याही देशाला करता आलेला नाही. 'चांद्रयान-३' मोहिमेचा संदर्भ देत असताना स्मिथ यांनी ही स्तुतिसुमने उधळली.
काय म्हणाले 'नासा'चे स्मिथ?
"भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशावर अंतराळ यान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश बनला. केवळ 'चांद्रयान-३' नव्हे तर गेल्या २० वर्षांत भारत अवकाशात खूप यशस्वी झाला आहे. जगभरात भारताच्या प्रयत्नांचा आदर केला जात आहे. मंगळावरील मिशन ही पहिलीच वेळ होती जेव्हा एखाद्या देशाने पहिल्याच प्रयत्नात मंगळाची परिक्रमा पूर्ण केली होती. भारताने गेल्या वर्षी चंद्रावर यशस्वी पाऊल ठेवले. जगाच्या इतिहासात, भारताने असे काही केले, जे आजपर्यंत कोणीही केलेले नाही," अशा शब्दांत स्मिथ यांनी इस्रोच्या कामगिरीला शाबासकी दिली.
"अवघ्या काही महिन्यांत मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी भारत स्वतःचे कॅप्सूल तयार करत आहे. त्यांनी त्यांच्या अंतराळवीरांची नावेही उघड केली आहेत. भारतीय अंतराळवीर भारतीय अंतराळयानातून अंतराळात जातील अशी अपेक्षा आहे. रशिया, जपान आणि अमेरिका यासारख्या अंतराळ दिग्गजांना मागे टाकून चांद्रयान-3 चांद्रयान मिशन साध्य करणे हे भारताचे 'धाडसी' पाऊल होते. त्यांची उद्दिष्टे आणि अथक परिश्रमाची मानसिकता खूपच कौतुकास्पद आहे," असे म्हणत त्यांनी भारताच्या भविष्यातील अंतराळ उद्दिष्टांना पाठिंबा दिला.