नवी दिल्ली: देशातील झुंडशाही पाहून भीती वाटते असं विधान करणाऱ्या अभिनेते नसीरुद्दीन शहांवर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका केली. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेनं शहांसाठी थेट पाकिस्तानचं तिकीट काढलं. यानंतर आता शहांनी त्यांच्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. मी पण देशभक्त आहे. पण मला गोंधळ घालण्याची गरज वाटत नाही, असं शहांनी म्हटलं. शहांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांचं विधान समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. नसीरुद्दीन शाह यांच्या विधानानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यामुळे त्यांना अजमेर लिटरेचर फेस्टिवलमधील सहभाग घेता आला नव्हता. आता अजमेरपासून दूर असलेल्या पुष्करमध्ये बंद दरवाज्याआड एका अज्ञात स्थळी नसरुद्दीन यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उर्दू लेखक सैफ मोहम्मद यांनी केलं. यावेळी नसीर यांनी 'नसीर का नजीर फिर एक दिन' या पुस्तकाचं प्रकाशन केलं. हा देश माझी मातृभूमी असल्याचं नसरुद्दीन शहांनी यावेळी म्हटलं. 'मे देशद्रोही नाही. देशावर टीका करताना मला दु:ख होतं. मात्र चुकीचं वाटल्यास त्यावर मी अवश्य बोलणार. मला देशाच्या भविष्याची चिंता वाटते. माझ्या 4 पिढ्या या देशात जन्मल्या. माझा जन्मदेखील याच देशात झाला. माझी मुलंदेखील इथंच राहणार आहेत. माझं देशावर खूप प्रेम आहे. मात्र त्यासाठी मला गोंधळ घालण्याची आवश्यकता वाटत नाही,' असं नसीरुद्दीन यांनी म्हटलं.