- संदीप भालेराव
नाशिक - श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाने २३० बसेसची व्यवस्था केली आहे. या कालावधीत थेट त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना मनाई असल्याने भाविकांना एस.टी. महामंडळाच्या बसेसमधूनच प्रवास करावा लागणार आहे.
तिसऱ्या श्रावण सोमवारी देशभरातील भाविक त्र्यंबकेश्वर येथे ब्रम्हगिरी परिक्रमेसाठी येतात. श्रावणातील प्रत्येक शनिवारी भाविक दर्शनासाठी येत असले तरी तिसऱ्या श्रावणी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने यानिमित्ताने महामंडळाने प्रवासी वाहतुकीचे नियोजन केले आहे. दिनांक १४ व १५ ऑगस्ट रोजी तिसरा श्रावणी रविवार व सोमवारी २३० जादा बसेस चे नियोजन करण्यात आले आहे. सदरच्या बसेस या जुने सी बी एस स्थानकावरून प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.
त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांच्या प्रवासासाठी एस.टी. महामंडळाकडून नियोजन केले जाते. जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या आढावा बैठकीतही महामंडळाने नियोजन सादर केले होते. त्यानुसार ३०० बसेसची तयारी महामंडळाकडून करण्यात आली आहे. भाविकांना बसस्थानकात दर पाच मिनिटाला बस उपलब्ध होईल असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारसाठी जाणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.
श्रावणी महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. मात्र, तिसऱ्या सोमवारी विशेष महत्त्व असल्याने, देशभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदा येणाऱ्या भाविकांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या बाबतीत प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.