चेन्नई : माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करीत पक्षाला रामराम ठोकला आहे. अनेक प्रकल्पांना मंजुरी देताना मी राहुल गांधी यांचे आदेश पाळले; मात्र केंद्रीय नेतृत्वाने मला अवमानित करून बाजूला सारले, अशी उघड टीका त्यांनी केल्यानंतर काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले. मात्र त्यांनी विशिष्ट प्रकरणांच्या मंजुरीसाठी दबाव आल्याचे सांगितल्याने त्या फायली तपासून पाहण्याचा पवित्रा मोदी सरकारने घेतला आहे. नटराजन या दीर्घकाळापासूनच्या काँग्रेसनिष्ठ म्हणून ओळखल्या जातात. संपुआ सरकारच्या काळात मंजुरी दिलेल्या पर्यावरण प्रकल्पांबाबत कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. असे कटू अनुभव आले असताना माझी कोणत्याही पक्षात जाण्याची इच्छा उरली नाही. वेदांतासारख्या प्रकरणातही जंगलांचे संरक्षण आणि आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण यांसारख्या धोरणांचे पालन केले आहे. मी काहीही चूक केलेले नाही, असे त्यांनी येथे तातडीने बोलावलेल्या पत्रपरिषदेत स्पष्ट केले. नटराजन यांनी दबावाखाली झालेल्या निर्णयांचे जे दाखले दिले, त्या सर्व प्रकरणांच्या फायली मोदी सरकारमधील पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर तपासून पाहतील. (वृत्तसंस्था)
नटराजन यांचा काँग्रेसला धक्का
By admin | Published: January 31, 2015 5:44 AM