नोटाबंदी, जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त; मोदी सरकारवर राहुल गांधी यांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 05:50 AM2018-10-10T05:50:35+5:302018-10-10T05:50:55+5:30
मोदी सरकारने घेतलेल्या जीएसएटी लागू करण्याच्या तसेच नोटाबंदीच्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त झाली, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.
ढोलपूर : मोदी सरकारने घेतलेल्या जीएसएटी लागू करण्याच्या तसेच नोटाबंदीच्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त झाली, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.
राजस्थानमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेलगत असलेल्या राजस्थानमधील ढोलपूर जिल्ह्यातील मनिया येथून राहुल गांधी यांच्या रोड शोला मंगळवारी प्रारंभ झाला. ते या रोड शोदरम्यान १५० कि.मी.चा प्रवास करणार आहेत. उद्या, बुधवारी ते बिकानेर शहराला भेट देणार आहेत. राहुल गांधी म्हणाले की, आपल्याला ‘चौकीदार’ बनायचे आहे, असे मोदी २०१४ च्या निवडणुकांतील प्रचारसभांमध्ये केलेल्या भाषणात सांगत असत. मात्र, नेमका कोणाचा चौकीदार व्हायचे आहे हे त्यांनी कधीही सांगितले नाही. याबाबतचे खरे चित्र अनिल अंबानींना त्यांच्याकडून ज्या प्रकारे मदत करण्यात आली त्यानंतर स्पष्ट झाले. हिंदुस्थान एरॉनॉटिकल लिमिटेड हा सार्वजनिक उपक्रम सक्षम असतानाही त्याला डावलून आजपर्यंत एकही विमान न बनविलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेल विमान खरेदी व्यवहारात भागीदार करून घेण्यात आले. (वृत्तसंस्था)
शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही
रोड शो सुरू होण्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना ते म्हणाले की, मोदी सरकारने शेतकºयांचे एक रुपया कर्जही माफ केलेले नाही. या सरकारने राबविलेल्या मेक इन इंडिया योजनेंतर्गत मोबाईल व टी-शर्टच्या निर्मितीसाठी केलेले प्रयत्न सपशेल अयशस्वी ठरले आहेत. आता चीनमध्ये निर्मिती करून या दोन गोष्टी भारतात आणल्या जात आहेत.