भोपाळ : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर पालिकेचे नगरसेवक आणि हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरसिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सन २०१७ मध्ये नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेचे उद्घाटन करणाऱ्यांमध्ये बाबूलाल चौरसिया यांचा सक्रीय सहभाग होता. तसेच महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची शपथ घेतल्यामुळे ते चर्चेत आले होते. नगरसेवक बाबुलाल चौरसिया यांच्या पक्षप्रवेशासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते. (nathuram godse bhakt babulal chaurasia joins congress in presence of kamal nath) मध्य प्रदेशात पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश पार पडला. मध्य प्रदेश काँग्रेसकडून बाबुलाल चौरसिया यांच्या पक्षप्रवेशाचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बाबुलाल चौरसिया यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम करत हिंदू महासभेत प्रवेश केला होता. हिंदू महासभेच्या तिकिटावर पालिका निवडणूक लढत जिंकली होती.
हज यात्रेला जाणारा भारतीय हिंदू म्हणूनच ओळखला जातो: योगी आदित्यनाथ
मी जन्मापासूनच काँग्रेसवाला
मी जन्मापासूनच काँग्रेसवाला आहे. नथुराम गोडसे यांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आपल्याला भाग पाडण्यात आले, असा आरोप करत आपण यापूर्वीही काँग्रेसमध्ये होतो. आपण कुटुंबात पुन्हा परतलो आहे, असे बाबुलाल चौरसिया म्हणाले.
गांधी कुटुंब मोठ्या मनाचे
काँग्रेसने राहुल गांधींचा उल्लेख करत बाबुलाल चौरसिया यांचा पक्षप्रवेश कसा योग्य आहे, याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. हिंदू महासभेकडून निवडणूक लढत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. गांधी कुटुंब मोठ्या मनाचे आहे. त्यांच्या याच आदर्श मूल्यांमुळे गोडसेची पूजा करणारा व्यक्ती गांधींची पूजा करत आहे, असे ग्वाल्हेरमधील काँग्रेस आमदार प्रवीण पाठक यांनी सांगितले.
कमलनाथ यांनीच प्रश्नाचे उत्तर द्यावे
कमलनाथ यांनी शिवराज सिंग चौहान यांना ते महात्मा गांधींसोबत आहात की, नथुराम गोडसेसोबत अशी विचारणा केली होती, आता कमलनाथ यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे,असे टोला भाजपा प्रवक्ते राहुल कोठारी यांनी लगावला आहे.