अर्वाकुरची - स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादीहिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होतं अस विधान अभिनेत्यापासून नेता झालेल्या कमल हसन यांनी केलं आहे. तामिळनाडू येथील हसन यांच्या मक्कल निधी मय्यम या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना अभिनेता कमल हसन यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. अर्वाकुरची येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
अर्वाकुरची येथे येत्या 19 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक होत आहे. याठिकाणी कमल हसन यांच्या राजकीय पक्षाचा उमेदवार उभा आहे. या उमेदवाराच्या प्रचारासाठी कमल हसन अर्वाकुरची येथे आले होते. त्यावेळी बोलताना कमल हसन म्हणाले की, पहिला हिंदूदहशतवादी नथुराम गोडसे होता. या ठिकाणी बहुसंख्य मुस्लिम असल्यामुळे मी हे बोलत नाही तर माझ्यासमोर महात्मा गांधी यांचा पुतळा आहे त्याच्यासमोर उभं राहून मी हे सांगतोय.
स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता. त्याचं नाव नथुराम गोडसे होतं. त्याच्यापासून दहशतवाद सुरु झाला. मी गांधींचा चाहता आहे मी त्यांच्या हत्येचा न्याय मागण्यासाठी आलो आहे. मी खरा भारतीय आहे. आणि कोणत्याही खऱ्या भारतीयाची देशात शांती आणि देशात समानता राखण्याची इच्छा असते असं यावेळी कमल हसन यांनी सांगितले. तसेच कोणताही खरा भारतीय नेहमी देशाचा झेंडा म्हणून तिरंग्याला पसंती देतो. आणि कायम देशाचा झेंडा तिरंगा राहील अशी त्याची इच्छा आहे असंही त्यांनी सांगितले.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू दहशतवादावरून काँग्रेसवर टीका केली आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी काँग्रेसने ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द प्रचलित करून समस्त हिंदूंचा अपमान केला असून पाच हजार वर्षांच्या संस्कृतीला कलंकित करण्याचे पाप केले आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घाणाघाती टीका केली होती. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्होटबँक वाचविण्यासाठी ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्द उच्चारून समस्त हिंदूंचा अपमान केला.
स्वामी असीमानंद यांची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली त्यानंतर भाजपाकडून काँग्रेसवर टीका करण्यासाठी हिंदू दहशतवादाचं कार्ड खेळण्यात आलं. असीमानंदाचा सुटका झाल्याने काँग्रेसचे षडयंत्र उघड झाले आहे. त्यामुळे देशातील जनतेने काँग्रेसला धडा शिकविण्याचा निर्णय घेतल्याचंही काँग्रेस जाणून आहे. म्हणूनच दोन्ही काँग्रेसचे नेते मैदान सोडून पळत आहेत. ज्यांनी हिंदू दहशतवादाचा प्रचार केलाय, ते लोक घाबरले आहेत. त्यामुळे याठिकाणी हिंदूंची लोकसंख्या कमी आहे, अशा मतदारसंघातून हे लोक निवडणूक लढवत आहेत असं सांगून राहुल गांधी यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत पंतप्रधान मोदींनी टीका केली होती.