नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांच्यासह 10 जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी येथील पटियाला हाऊस कोर्टात हे आरोपपत्र केले. त्यामध्ये कन्हैय्या कुमार यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याअंतर्गत दोष सिद्ध झाल्यास आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते.
जेएनयू येथे केलेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने पटीयाला हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल केले. जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारसह 10 जणांवर 2016 साली दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाच्या खटल्यांतर्गत हे आरोप ठेवण्यात आले आहेत. तब्बल 1200 पानांच्या या आरोपपत्रावर उद्यापासून सुनावणी होणार आहे. 'हम लेके रहेंगे आजादी..., संगबाजी वाली आजादी..., भारत तेरे टुकडे होंगे..., कश्मीर की आजीदी तक जंग रहेगी..., भारक के मुल्क को एक झटका और दो..., भारत को एक रगड़ा और दो..., तुम कितने मकबूल मरोगे..., इंडियन आर्मी को दो रगड़ा..' आदी घोषणा आरोपपत्रात नमूद करण्यात आल्या आहेत.
कन्हैय्या कुमारवर भा. दं. वि. कलम 124 अ (देशद्रोह), 323 (एखाद्यास इजा पोहचविण्यासाठी शिक्षा), 465, 143, 149, 147, 120 ब या कलमांतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, देशद्रोहाच्या खटल्यात आजीवन कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात सबळ पुरावे असून व्हिडीओ आपल्याकडे असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच कन्हैय्या कुमारच या आंदोलककर्त्यांचं नेतृत्व करत होता. दरम्यान, पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर कन्हैय्या कुमारने ट्विट करुन मोदींचे आभार मानले आहेत.