ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ६ - मदरशातल्या मुलांना राष्ट्रगीत शिकवणा-या मुख्याध्यापकावर एका मौलाना आणि त्यांच्या अनुयायांनी वर्षापूर्वी मारहाण केली होती व त्याच्याविरोधात फतवाही काढला होता. काही महिने हॉस्पिटलमध्ये रहावं लागलेला सदर मुख्याध्यापक मदरशात जाऊही शकत नाहीये. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींपर्यंत या घटनेची कल्पना देऊनही न्याय मिळत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आहे.
काझी मासूम अख्तर हे कोलकात्यातल्या तालपुकूर आरा मदरशात मुख्याध्यापक आहेत. स्वातंत्र्यदिनाची तयारी म्हणून त्यांनी मुलांना राष्ट्रगीत शिकवण्यास सुरुवात केली होती. मात्र, राष्ट्रगीत हे हिंदुत्वाचं काव्य असून धर्मद्रोही असल्याचं मौलानांचं म्हणणं असून त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी काझींना जबर मारहाण केली. काही महिने काझींना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. विशेष म्हणजे राज्य सरकारने घेतलेल्या मुलाखतीच्या प्रकियेतून त्यांची नेमणूक झाली होती. परंतु, जर मुस्लीम वेषात, मोलाना सांगतिल तेवढ्या आखूड पायजम्यात दाढी वाढवून आलं तरच मदरशात प्रवेश मिळेल असा फतवाही काढण्यात आला आहे. दर आठवड्याला दाढी किती वाढली आहे हे दाखवणारा फोटोही पाठवण्यास त्यांना सांगण्यात आले.
अनेक तक्रारी करूनही काही फायदा झाला नाही आणि त्यातही गंभीर बाब म्हणजे अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांना कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांनी लेखी कळवलं आहे की, धार्मिक तणाव लक्षात घेता काझी मासूम अख्तरना सुरक्षा पुरवता येणार नाही.