Parliament Session: संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले. दरम्यान, आज पहिल्याच दिवशी राष्ट्रगीतावरुन गोंधळ निर्माण झाला. लोकसभेत नियोजित वेळेपूर्वी राष्ट्रगीत वाजल्याने विरोधकांकडून निषेध व्यक्त झाला. चुकीच्या वेळी राष्ट्रगीत वाजले आणि पूर्ण होण्यापूर्वीच थांबवले. यावरुन विरोधी खासदारांनी आक्षेप नोंदवला.
अधिवेशन सकाळी 11 वाजता सुरू होणार होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला त्यांच्या जागेवर बसल्यानंतर राष्ट्रगीत सुरू व्हायला हवे होते, पणत्यापूर्वीच सुरू झाले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्यासह सभागृहात उपस्थित असलेले सर्व खासदार आदराने उभे राहिले. मात्र चुकून राष्ट्रगीत वाजले असल्याने ते मध्येच बंद करण्यात आले. यावरुन वाद निर्माण झाला.
अचानक राष्ट्रगीत थांबवल्याबद्दल विरोधी पक्षाच्या खासदारांनी विरोध केला, त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांना हस्तक्षेप करावा लागला. सभापतींनी संतप्त सदस्यांना शांत केले आणि तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले.
या प्रकरणाची चौकशी केली जाईलयानंतर काँग्रेसचे सभागृह नेते अधीर रंजन यांनी 'तुमचा अपमान होतो तेव्हा ते आम्हाला आवडत नाही', असे म्हटले. त्यावर बिर्ला यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन सदस्यांना दिले. यानंतर वातावरण थोडं शांत झाल्यावर पूर्ण राष्ट्रगीत वाजवण्यात आले.
परंपरा म्हणजे काय?
संसदेच्या अधिवेशनाच्या सुरुवातीला सभागृहात राष्ट्रगीत - 'जन, गण, मन...' वाजवले जाते. 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताच्या वादनाने सत्राचा समारोप होतो. सत्राच्या सुरुवातीला सभापती आल्यानंतर राष्ट्रगीत वाजवले जाते आणि त्यानंतर चर्चा सुरू होते. मात्र आज तांत्रिक त्रुटीमुळे स्पीकर येण्यापूर्वीच राष्ट्रगीत वाजवण्यात आले.