नवी दिल्ली, दि. 10- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या संसदीय बैठकीत खासदारांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. आता राज्यसभेत अध्यक्ष आले आहेत, तुमच्या मौजमजेचे दिवस आता बंद होतील. तुम्ही स्वतःला काय समजता. तुम्ही काहीच नाही, तर मीसुद्धा कोणीही नाही, जे काही आहे ते भाजपाचं आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
व्हिप काय आहे, सारखा सारखा व्हिप का काढावा लागतोय. तुम्हाला हजेरी लावण्यास वारंवार का सांगावं लागतंय. आता ज्या खासदारांना जे करायचं आहे ते त्यांनी करावं, 2019मध्ये मी तुमच्याकडे पाहतो, असा इशारा मोदींनी खासदारांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहसह सर्व खासदारांनी भाजपाच्या बैठकीत सहभाग घेतला होता.
बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शाह यांचं लाडू भरवून स्वागत केलं. बैठकीत भाजपा अध्यक्ष अमित शाहांनी कोर्टात जाण्याचे संकेत दिले आहेत. अहमद पटेल प्रकरणात अमित शाह कोर्टात जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत कोर्टात जाण्याचे संकेत दिले होते.सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांचाही राज्यसभा निवडणुकीत विजय झाला आहे. पराभूत करण्यासाठी भाजपाने कसलेली कंबर, पक्षातील आमदारांमध्ये पडलेली फूट आणि प्रत्यक्ष निवडणुकी दिवशी रंगलेले राजकीय नाट्य या सर्वांवर मात करत अहमद पटेल यांनी विजय मिळवला होता. या विजयानंतर अहमद पटेल यांनी ट्विटरवरून सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली. "ही निवडणूक माझ्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात अवघड निवडणूक होती. बऱ्याच निवडणुका लढवल्या मात्र एवढे आव्हान कधी मिळाले नव्हते. भाजपाकडून मला पराभूत करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारने मला पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती. त्यांचा यामागे काय हेतू होता हे माहीत नाही." असे अहमद पटेल म्हणाले होते.तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपाच्या अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला. भाजपाच्या अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला. अमित शाह आणि स्मृती इराणी यांना प्रत्येकी 46 मते मिळाली, तर अहमद पटेल यांनी भाजपाच्या सर्व राजकीय रणनीतीला मात देत 44 मते मिळवून राज्यसभेसाठीचा रस्ता मोकळा केला.