नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठविली आहे. बुधवारी राजस्थानमधील एका सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यावेळी नरेंद्र मोदी घाबरले आहेत आणि आपल्या बचावासाठी ते महिला मंत्र्यांना पुढे करत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. दरम्यान, राहुल यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राहुल गांधी महिलांना कमजोर समजतात काय, असा सवाल रेखा शर्मा यांनी केला आहे. तसेच, राहुल गांधी यांचे हे वक्तव्य आपत्तिजनक असून त्यांनी महिलांचा अपमान केल्याचेही रेखा शर्मा यांनी सांगितले. याप्रकरणी राहुल गांधी यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसकडून महिलांचा अपमान होत असल्याची टीका केली होती. नरेंद्र मोदींच्या या टीकेला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. 'मोदीजी, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरापासून सुरू होतो,' असे म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे.
'मोदीजी तुमचा संपूर्ण आदर ठेवत सांगतो, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरातून सुरू होतो. विषय भरकटवू नका. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. ज्यावेळी तुम्ही मूळ राफेल करारात बदल केला, त्यावेळी वायुसेना आणि संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतला होता का? हो की नाही?' असा सवाल राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे.
राफेल मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सतत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात नरेंद्र मोदी यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप राहुल गांधी यांनी आहे.
(मोदीजी, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरातून सुरू होतो - राहुल गांधी)