जम्मू काश्मीरमध्ये एनसी-काँग्रेसचे जागावाटप जाहीर; पाच जागांवर एकमेकांविरोधात लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 20:17 IST2024-08-26T20:16:40+5:302024-08-26T20:17:14+5:30
सोमवारी सायंकाळी या जागावाटपाची घोषणा करण्यात आली. जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षांनी निवडणूक होत आहे.

जम्मू काश्मीरमध्ये एनसी-काँग्रेसचे जागावाटप जाहीर; पाच जागांवर एकमेकांविरोधात लढणार
जम्मू काश्मीरमध्ये एकामागोमाग एक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करू लागले आहेत. आज भाजपाने यादी जाहीर केल्यानंतर वादंग झाल्याने पुन्हा ती मागे घेत ४० पैकी १५ च नावे ठेवली आहेत. तरीही उमेदवारीवरून वाद सुरु आहेत. असे असताना नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने आघाडीची घोषणा केली आहे.
दोन्ही पक्षांनी जागा वाटप जाहीर केले असून फारुख अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स ५१ जागा तर काँग्रेस ३२ जागा लढविणार आहे. दोन्ही पक्ष ८५ जागांवर उमेदवार देणार आहेत. सीपीआयएम आणि पँथर्सच्या वाट्याला एक-एक जागा सोडण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सोमवारी सायंकाळी या जागावाटपाची घोषणा करण्यात आली. जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षांनी निवडणूक होत आहे. एनसी आणि काँग्रेसने पाच जागांवर परस्पर सहमती न बनल्याने या जागांवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचे ठरविले आहे. इंडिया आघाडीचा मुख्य उद्देश जम्मू काश्मीरला वाचविण्याचा आहे. एक मैत्रीपूर्ण सरकार बनविण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही एकत्र लढणार आणि जिंकणार आहोत, असे काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.
जम्मू-कश्मीरला केंद्र शासित प्रदेश बनविण्यात आले आहे. तेथील 370 कलम रद्द करण्यात आले आहे. यानंतर तिथे पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. यामुळे भाजपाला या राज्याकडून जास्त अपेक्षा आहेत.