Farooq Abdullah News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीमधील धूसपूस आता निवळताना दिसत आहे. सपा आणि आम आदमी पक्षासोबत जागावाटपाच्या चर्चा यशस्वी झाल्याचे चित्र आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकसभेच्या पाचही जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आता जम्मू-काश्मीरमध्येही इंडिया आघाडीला दिलासा मिळतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. यातच काश्मीर हा भारताचाच भाग होता आणि पुढेही कायम राहील, असे विधान फारूक अब्दुल्ला यांनी केले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले की, काश्मीर हा भारताचा भाग होता. काश्मीर भारताचा भाग आजही आहे आणि नेहमीच काश्मीर हा भारताचा भाग राहील, असे फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले. फारुख अब्दुल्ला यांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्न उपस्थित केला. निवडणूक आयोग निष्पक्षपातीपणे निवडणुका घेईल, अशी आशा आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्राला बळकट करण्यासाठी त्यातील विविधता जपली पाहिजे, असे मत फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.
दरम्यान, फारूक अब्दुल्ला सातत्याने भाजपासोबत युती करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते. सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर फारूक अब्दुल्ला हे भाजपासोबत सरकार स्थापन करण्यास उत्सुक होते. त्या प्रक्रियेचा मीदेखील एक भाग होतो. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पुन्हा एकदा फारूक अब्दुल्ला यांनी तसा प्रयत्न केला होता, असा दावा भाजपा नेते देवेंद्र सिंह राणा यांनी केला होता.