Baramulla terrorist attack :जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं आहे. यानंतरही जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीये. नवं सरकार आल्यापासून दहशतवादी हल्ले थांबण्याऐवजी आणखी वाढले आहेत. गेल्या१५ दिवसांत झालेल्या वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरांसह ७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरुवारीही गुलमर्ग येथे आणखी एक दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये लष्कराचे दोन कुली आणि दोन सैनिक शहीद झाले. या वाढत्या हल्ल्यांबाबत आता नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये वाढ झाली आहे.२० ऑक्टोबर रोजी गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात बोगद्याच्या बांधकामाच्या जागेवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सहा मजूर आणि एक स्थानिक डॉक्टर ठार झाल. यापूर्वी १८ तारखेलाही शोपियानमध्ये बिहारमधील एका मजुराची हत्या करण्यात आली होती. या घटनांदरम्यान, राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सुरक्षा दलांना कडक पावले उचलण्याचे आणि पोलीस आणि लष्कराला एकत्रितपणे कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही अद्याप कोणतेही नियंत्रण दिसत नाही.
दुसरीकडे, या दहशतवादी हल्ल्यांवर फारुख अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'या राज्यात असेच होत राहणार आहे. जोपर्यंत या समस्येतून मार्ग निघत नाही तोपर्यंत ही समस्या थांबणार नाही. मी ३० वर्षांपासून निरपराध लोकांची हत्या होताना पाहतोय, असं विधान फारुख अब्दुल्ला यांनी केलं आहे. फारुख अब्दुल्ला यांनी केलेल्या विधानाची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी, खोऱ्यात अलीकडे झालेले हल्ले ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे म्हटलं आहे.
"या राज्यात असेच होत राहणार आहे. जोपर्यंत या समस्येतून मार्ग निघत नाही तोपर्यंत ही समस्या थांबणार नाही. ते कुठून येतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मी ३० वर्षांपासून निरपराध लोकांची हत्या होताना पाहतोय. आम्ही पाकिस्तानचा भाग होणार नाही आहोत मग ते असे का करत आहेत? आमचे भविष्य उध्वस्त करण्यासाठी? त्यांनी त्यांच्या देशाकडे पाहिले पाहिजे. मी त्यांना पुन्हा आवाहन करतो की, हे थांबवावं आणि मैत्रीचा मार्ग शोधावा. मैत्री झाली नाही तर भविष्य खूप कठीण जाईल. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो," असं फारुख अब्दुल्ला म्हणाले.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन जवानांचा मृत्यू झाला. त्यामुळे या हल्ल्यात जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ झाली आहे. तसेच सशस्त्र दलात काम करणाऱ्या दोन कुलींचाही मृत्यू झाला. तीन सैनिकांसह चार जण जखमी झाले होते त्यापैकी दोघांचा नंतर मृत्यू झाला. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गपासून सहा किलोमीटर अंतरावर दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला होता. बुटापाथरी भागात लष्कराचे वाहन अफ्रावत रेंजमधील नागीन पोस्टकडे जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.