नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून वारंवार वादग्रस्त विधान करुन काँग्रेसचे नेते शशी थरूर चर्चेत असल्याचं दिसत आहे. 'हिंदू पाकिस्तान' संदर्भात केलेल्या विधानावरुन सुरू झालेला वाद अद्याप मिटलेला नसताना शशी थरुर यांनी आणखी एक वादग्रस्त ट्विट केले आहे. 'देशातील कित्येक ठिकाणी मुस्लिमांच्या तुलनेत गाय सर्वाधिक सुरक्षित आहे', असे वादग्रस्त ट्विट थरुर यांनी रविवारी (22 जुलै) केले आहे. या ट्विटमुळे आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
थरुर यांनी असे ट्विट केले आहे की, 'जातीय हिंसाचारात घट होण्याबाबत भाजपा मंत्र्यांकडून करण्यात आलेले दावे वस्तुस्थितीत खरे का उतरत नाहीत. यावरुन असे दिसते की कित्येक ठिकाणी मुस्लिमांच्या तुलनेत गाय सर्वाधिक सुरक्षित आहे.'
(मला पाकिस्तानात जा म्हणणारे हे कोण?, शशी थरुर यांचा भाजपा, RSSवर हल्लाबोल)
गो-तस्करीच्या संशयावरुन राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात जमावानं केलेल्या मारहाणीत 28 वर्षीय अकबर खानचा मृत्यू झाला. या घटनेबाबत निषेध नोंदवताना शशी थरुर यांनी हे वादग्रस्त ट्विट केले आहे.
नेमकी काय आहे घटना?
मूळ हरियाणा जिल्ह्याचा रहिवासी, पण राजस्थानात गोपालन व दूध व्यवसाय करणाऱ्या अकबर खानला रामगड गावी ठार करण्यात आले. तो हत्येसाठी गाय नेत असावा, असा संशय गोरक्षकांना आला आणि जमावानं त्याला ठार केले. त्याच्याबरोबर एक मित्रही होता. दोन जणांनी अन्य गावकऱ्यांना बोलावून त्यांना मारहाण केली. विचारपूस करण्याआधीच जमावानं त्याला व त्याच्या सहकाऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अकबर खान मरण पावला. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. हरियाणातील कोलगाव येथून त्यानं गायी आणल्या होत्या आणि त्या घरी नेत होता, अशी माहिती समोर आली आहे. मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी अकबरच्या वडिलांनी केली आहे.