गिरिदीह - झारखंडच्या गिरिदीह येथे सोमवारी (15 एप्रिल) नक्षलवादी आणि सीआरपीएफमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीदरम्यान तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सीआरपीएफ जवानांना यश आले आहे. चकमकीदरम्यान एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमध्ये नक्षलवादी आणि सीआरपीएफमध्ये चकमक झाली आहे. सीआरपीएफच्या 7 बटालियनने बेलभा घाट येथील जंगल परिसरात स्पेशल ऑपरेशन सुरू केलं होतं. यावेळी नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. सीआरपीएफ जवानांनी चोख उत्तर देत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच नक्षलवाद्यांकडून एक एके-47 रायफल, 3 मॅगजिन्स आणि चार पाइप बॉम्ब इतका शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये भाजपाचा ताफा निवडणूक प्रचाराहून परतत असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. या स्फोटात दंतेवाडाचे भाजपा आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला होता, तर चार जवान शहीद झाले होते.
छत्तीसगडमधील चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा
सुकमामधील बिमापूरममध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी (26 मार्च) चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला होता. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा येथे नक्षलवादी आणि कमांडो बटालियन दरम्यान चकमक झाली होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. बिमापूरमपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर ही चकमक झाली. कोबरा 201 बटालियनचे कमांडो सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी कमांडोंच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला. या गोळीबारात 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. नक्षलवाद्यांकडून 1 रायफल आणि दोन थ्री नॉट थ्री रायफल ताब्यात घेण्यात आल्या आहेत. गोळीबार थांबल्यानंतरही जवानांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू ठेवलं होतं.
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात याआधी काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पाच जवान जखमी झाले असून एका जवानाला हौतात्म्य पत्करावे लागले होते. सीआरपीएफ जवानांची एक तुकडी पोलिसांसोबत आरनपूर क्षेत्रात तैनात होती. त्याचवेळी नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट घडवण्यात आला होता. स्फोटानंतर लगेचच पोलिसांवर गोळीबारही करण्यात आला होता. या चकमकीत 'सीआरपीएफ'चे सहा जवान जखमी झाले होते. मात्र, त्यानंतर एक जवान हुतात्मा झाला. सुरक्षा दलांकडून हा हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते.