नवी दिल्ली - सोलापूर जिल्ह्याच्या बार्शीसारख्या ग्रामीण भागातील तरुणाने, एका सफाई कामागाराच्या मुलाने आज स्वप्न सत्यात उतरवलं आहे. दिग्दर्शक विनोद कांबळे यांच्या कस्तुरी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून आज राजधानी दिल्लीत उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्याहस्ते त्यांनी हा पुरस्कार स्विकारला. विनोद कांबळेंच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक होतंय, अभिनंदन केलं जात आहे. ग्लोबल टीचर्स अवॉर्ड विजेत्या डिसले गुरुजींनीही विनोद कांबळेंचे ट्विटरवरुन अभिनंदन केलंय.
विनोद कांबळे दिग्दर्शित 'कस्तुरी' या हिंदी बालचित्रपटाला यंदाचा 67 व्या राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता. राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा होताच विनोदवर कौतुकांचा वर्षाव सुरू झाला. मित्रपरिवारासह अनेक दिग्गजांचे फोन आले अन् स्वत:च्या भूतकाळात हरवलेल्या विनोदच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. बार्शीच्या 'कस्तुरी'चा सुगंध देशभर दरवळला. आज, विनोद यांनी दिल्लीत या पुरस्काराचा सन्मान स्विकारला. आपल्या लेकाला दूरदर्शनवरुन जवळ पाहताना आई-वडिलांसह कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू होते. नगरपालिकेत सफाई कामगार असलेल्या विनोदच्या वडिलांची छाती अभिमानाने फुगली होती. तर, मित्र परिवारानेही टाळ्या वाजवून कौतुक केलं. विनोद यांनीही व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या सहकारी मित्रांशी संवाद साधला.
नोकरी मिळावी म्हणून इंजिनिअरींग केलं
बार्शीसारख्या ग्रामीण भागातील तरुण, कौटुंबिक पार्श्वभूमीचं म्हणाल तर लहानपणी घरी टीव्ही नसल्यानं नीट पिच्चरही बघायला मिळाले नाहीत. पिढ्यान-पिढ्या सफाई कामगार म्हणून राबणाऱ्या गरीब कुटुंबात विनोदचा जन्म. वडिल आजही बार्शी नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतात, तर आईही अशिक्षित. चित्रपट म्हणजे थिल्लरपणा आणि टाइमपास असाच सर्वांचा समज. त्यामुळेच, महाराष्ट्र विद्यालयातून दहावी, तर शिवाजी कॉलेजमधून बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर कराडच्या शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजला विनोदने प्रवेश घेतला. आता पोरगा इंजिनिअर होणार म्हणून आई-वडिलांचा आनंद बार्शीत मावेना. पण, पोराच्या मनात वेगळचं काहीतरी सुरू होतं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर आई-वडिलांच्या आग्रहास्तव विनोदने नोकरी पत्करलीही, पण मन स्वस्थ बसू देईना. सरकारी नोकरीसाठी एमपीएससी परीक्षाही दिली. पण, तो आपला पिंडच नाही, हेही त्याला माहिती होतं.
बॅकस्टेजलाही काम केलं
आकुर्डीला पुण्यात एमपीएससी परीक्षेचा पेपर देताना, शेवटच्या 15 मिनिटांत प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पानावरच 'भिकारी' नावाने स्क्रीप्ट लिहिली अन् आता सगळं बस्स म्हणत चित्रपट क्षेत्राकडे दृढनिश्चयानं पाऊल टाकलं. पुढ ग्रहण नावाने ती शॉर्टफिल्म केली. आई-वडिलांची समजूत काढत इंजिनिअरिंग अन् एमपीएससीला 'द एन्ड' करत सिनेसृष्टीच्या प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीला बार्शीतील मानव चित्रपट संस्थेसोबत बॅक स्टेजला काम केलं. चित्रपट निर्मित्तीची बाराखडीही येथूनच शिकली, त्यानंतर 2018 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या 'म्होरक्या' चित्रपटाचं सहायक दिग्दर्शन केलं. अमर देवकर, अतुल लोखंडे, जयभीम शिंदे, साजिद बागवान, गिरीष देवकते, मोहित वायकुळे यांच्यामुळे चांगली टीम बनली. याच काळात 'पोस्टमार्टम' या शॉर्टफिल्मचीही निर्मित्ती केली. या शॉर्टफिल्मनेही अनेक फिल्म फेस्टीव्हलमध्ये अवॉर्ड मिळवले.
पोस्टमार्ट शॉर्टफिल्मने दिला आत्मविश्वास
वर्तमानपत्र वाचनाची आवड असल्याने पेपरात आलेली पोस्टमार्टम करणाऱ्या युवकाची बातमी वाचली अन् समाजव्यवस्थेचं पोस्टमार्टम करण्याची संकल्पना रूजली. पोस्टमार्टम ही शॉर्टफिल्मच कस्तुरीचं उगमस्थान असल्याचं विनोद यांनी सांगितलं. कारण, पोस्टमार्टम वाचताना भूतकाळ डोळ्यासमोर उभारला, आपला इतिहास दिसला, निर्मितीवेळी हा इतिहासच समाजासमोर उलघडला. बार्शीच्या ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करणाऱ्या सनी चव्हाणची भेट घेतली, त्याच्यासोबत फिरलो, त्याचं दु:ख समजावून घेतलं. मृतदेहांचं पोस्टमार्टम करणाऱ्या सनीला कुणी जवळही करत नसत, त्याच्यापासून सर्वजण दूर पळत, हेही अनुभवलं. आपल्या अंगाचा वास येऊ नये म्हणून अत्तर लावणाऱ्या सनीला पाहिलं अन् 'कस्तुरी'चा जन्म झाला.
आजीसोबत सफाई कामावर गेलो
आजी लहानपणी सफाईच्या कामासाठी बार्शीच्या रस्त्यांवर फिरायची, आजीसोबत मीही शाळेत असताना या कामावर जायचो. गटार साफ करणारी, झाडू मारणारी आणि दुर्गंधीत स्वत:ला वाहिलेली माणसं पाहून लाज वाटायची, आजही वाटते. आपला हा इतिहासच पडद्यावर झळवण्याचा प्रयत्न मी 'कस्तुरी'च्या माध्यमातून केलाय. सोमवारी कस्तुरीला राष्ट्रीय पारितोषक पुरस्कार जाहीर झाला अन् 2014 पासून सुरू असलेल्या संघर्षाचं, कष्टाचं चीज झालं. आपला, प्रवास योग्य दिशेनं सुरू असल्याची जाणीव या पुरस्काराने करुन दिलीय. गेल्या 7 ते 8 वर्षांत आई-वडिलांना माझ्याकडून काहीच मिळालं नाही, आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी कमावलेलाय. नगरपालिकेत काम करणाऱ्या उत्रेश्वर बाळू कांबळेंना आज पोराचा अभिमान वाटतोय हाही माझ्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारच असल्याचं विनोद म्हणतो.
काय आहे 'कस्तुरी'
कस्तुरी ही गटारातील गाळ काढणाऱ्या सफाई कामगाराची कथा आहे, कथेचा नायक शाळकरी मुलगा आहे, ज्याच्या अंगाचा घाण वास येत असतो. आपल्या अंगाचा येणारा घाण वास टाळण्यासाठी तो अत्तर लावतो, एका मित्राकडून कस्तुरीबद्दल त्याला माहिती मिळते. मग, हा नायक कस्तुरीच्या शोधात वण वण फिरतो, पारध्याजवळच तुला कस्तुरी मिळेल हे त्याला समजते, अखेर तो पारध्यापाशी पोहचतो. मग, कस्तुरी मिळते की नाही, खरी कस्तुर कुठे असते, हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहा. दिग्दर्शकाने 'कस्तुरी'च्या माध्यमातून समाजव्यवस्थेवर प्रहार केलाय. आजही मेहतर समाजावर आघात करणाऱ्या वास्तवाला त्यांनी जगासमोर मांडलंय. कस्तुरी म्हणजे 'आप्त दिपं भवं'.. स्वत:चा शोध घेणं.
अकरावीत शिकणारा समर्थ सोनवणे प्रमुख नायकाच्या भूमिकेत असून श्रवण उपळकरचाही अभिनय लक्षवेधी आहे, दोन्ही कलाकार बार्शीचे आहेत. चित्रपटाची सिनेमाटोग्राफी करणारे मनोज काकडे हेही मूळ बार्शीचे असून सध्या पुण्यात स्थायिक आहेत. नवकलाकारांना, ग्रामीण भागातल्या कलाकारांना घेऊन बनवलेल्या दिग्दर्शकाने बनवलेल्या कस्तुरीचा सुगंध देशभर दरवळा.
आवडीच्या क्षेत्रात स्वत:ला शोधणाऱ्यांचा हा अवॉर्ड
'कस्तुरी' चित्रपटाला मिळालेला पुरस्कार आवडीच्या क्षेत्रात स्वत:ला शोधणाऱ्यांचा आहे, स्वत:चा शोध घेणाऱ्या प्रत्येकाचा हा अवॉर्ड आहे. आता चित्रपट क्षेत्रातच काम करायचंय, नागराज मंजुळे हे आमच्याच जिल्ह्यातले असल्याने प्रेरणास्त्रोत आहेत, तर अनुराग कश्यप आणि विशाल भारद्वाज हे आवडीचे दिग्दर्शक असल्याचं विनोद यांनी सांगितलं. पुण्यात 8 महिलांनी एकत्र येऊन इनसाईट फिल्म प्रोडक्शन नावाने कंपनी सुरू केलीय. या सिनेमाचा पहिलाच चित्रपट 'कस्तुरी' आहे. कोरोनाची परिस्थिती पाहून लवकरच कस्तुरी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आहे, असे विनोद यांनी सांगितलं.