नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतरांवर आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांनी ९ एप्रिल रोजी दाखल आरोपपत्रातील महत्त्वाच्या मुद्यांची पडताळणी करून सुनावणी २५ एप्रिल रोजी निश्चित केली.
आरोपपत्रात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचीही नावे आरोपी म्हणून समाविष्ट आहेत. सुनावणीत ईडी व तपास अधिकाऱ्यांचे विशेष वकील न्यायालयाच्या अवलोकनार्थ केस डायरी सादर करतील.
१९३८ मध्ये पं. नेहरू यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राच्या मालमत्ता यंग इंडियनच्या नावे वळवल्याचा आरोप आहे.
हा प्रकार सूडाचे राजकारण आणि धमकावण्याचा आहे. यावर काँग्रेस गप्प राहणार नाही. -जयराम रमेश, काँग्रेस सरचिटणीस
हेरॉल्ड प्रकरणात झालेली कारवाई ही न्यायालयाच्या आदेशानुसार झाली आहे. राजकीय सुडाची भावना नाही. -शहजाद पूनावाला, भाजप प्रवक्ते