नवी दिल्ली - काही तासांपूर्वीच ईडीने हेराल्ड हाऊस सिल केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवासस्थान असलेल्या १० जनपथ आणि काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांच्या स्पेशल ब्रँचने काँग्रेस मुख्यालय आणि सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर मोठे आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली होती. त्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीकडून यंग इंडियनच्या कार्यालयाला सिल करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त होऊन मोठे आंदोलन करण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले. १० जनपथ आणि काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून काँग्रेसच्या नेत्यांना माहिती दिली जात आहे.
दरम्यान, यावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या मुख्यालयाला जोडणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. ही बाब धक्कादायक आहे. दुसरीकडे पोलिसांनी सांगितले की, काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलक जमा होऊ शकतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, दिल्ली पोलिसांकडून अखिल भारतीय काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या रस्त्याला बंद करणे ही बाब आता अपवाद नाही तर सामान्य बाब बनली आहे. आजही त्यांनी हेच केलंय, ही बाब रहस्यमय आहे. जयराम रमेश यांनी या संदर्भातील एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे, त्यात अनेक पोलीसही दिसत आहे.
दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभिषेक मनु सिंघवी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, महागाईवर चर्चा होऊ नये, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेससोबत दहशतवाद्यांप्रमाणे वर्तन केलं जात आहे.