National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तीन दिवस जवळपास तीस तास राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. पुढील चौकशीसाठी सोमवारपर्यंतची वेळ देण्यात यावी असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यांची ही मागणी ईडीनं मान्य केली असून आता पुढील चौकशी सोमवारी केली जाणार आहे. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी कोविडबाधित आणि फुफ्फुसाच्या संसर्गातून पूर्ण बरं होईपर्यंत अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्यासाठी काही आठवड्यांसाठीचा वाढीव कालावधीची मागणी केली आहे.
सोनिया गांधी यांच्यावर 12 जूनपासून दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू होते. 20 जून रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोविड संसर्गानंतर त्यांना नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता आणि त्यांच्यावर पुढील शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. "कोविड आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना घरी विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला असल्याने, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज ईडीला पत्र लिहून पूर्णपणे संसर्गातून बाहेर पडेपर्यंत ईडीसमोर हजेरी काही आठवड्यांनी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे." असे काँग्रेसचे संपर्क प्रभारी रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.