National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी मंगळवारी पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या आहेत. दरम्यान, ईडीच्या या कारवाईविरोधात काँग्रेसने गल्लीपासून ते संसदेपर्यंत जबरदस्त विरोध केला. या मुद्द्यावर एकीकडे, काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात सरकारला घेरले, तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी, रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून विजय चौकापर्यंत मार्च काढला. यानंतर, राहुल गांधींनी खासदारांसह विजय चौकात धरणे आंदोलन केले. यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि इतर काही खासदारांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांना किंग्सवे कॅम्पमध्ये नेले.
यादरम्यान, राहुल गांधींनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ''हुकूमशाहीकडे पाहा, आम्ही शांतिपूर्ण निदर्शने करू शकत नाही. महागाई आणि बेरोजगारीवर चर्चा करू शकत नाही. पोलिस आणि एजन्सीचा गैरवापर करून, आम्हाला अटक करूनही तुम्ही आम्हाला शांत करू शकणार नाही. सत्यच या हुकूमशाहीचा अंत करेल,'' असे ट्विर राहुल यांनी केले.