National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज(मंगळवार) चौकशी होत आहे. ईडीच्या या कारवाईविरोधात काँग्रेसने देशभरात विविध ठिकाणी तीव्र विरोध दर्शवला. दरम्यान, दिल्लीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. श्रीनिवास यांना ताब्यात घेत असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत एक व्हिडिओ जारी केला असून, यात पोलीस कर्मचारी श्रीनिवास यांचे केस ओढताना दिसत आहेत.
‘पोलिस-एजन्सीचा गैरवापर; तुम्ही आम्हाला शांत करू शकणार नाही’, राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्या पोलिसांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. दिल्ली पोलिस म्हणाले की, आम्ही त्या कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. कर्मचाऱ्यांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. श्रीनिवास यांनी ट्विटरवर लिहिले की, "स्वतंत्र भारतात काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्याच पक्षाच्या मुख्यालयाबाहेर येऊ शकत नाहीत. मग लोकशाहीचा काय अर्थ उरतो? हुकूमशहा आम्हाला इतका का घाबरतो?'
नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केंद्रीय एजन्सी ईडी सोनिया गांधी यांची चौकशी करत आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेस रस्त्यावर उतरुन गल्लीपासून दिल्लीपर्यंत निदर्शने करत आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून विजय चौकापर्यंत मार्च काढला. यानंतर, राहुल गांधींनी खासदारांसह विजय चौकात धरणे आंदोलन केले. यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि इतर काही खासदारांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांना किंग्सवे कॅम्पमध्ये नेले.