नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने(Enforcement Directorate-ED) दिल्लीत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीने मंगळवारी कथित नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणाच्या संदर्भात दिल्ली आणि इतर ठिकाणी किमान डझनभर ठिकाणी छापे टाकले असून, बहादूर शाह जफर मार्गावरील 'हेराल्ड हाऊस' कार्यालयावरही ही छापेमारी सुरू आहे. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकाशित करणाऱ्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या नावाने हा पत्ता नोंदणीकृत आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत छापे टाकले जात आहेत. या प्रकरणासंदर्भात अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी ही कारवाई सुरू आहे. नॅशनल हेराल्ड कार्यालयात सुरक्षा रक्षकाशिवाय कोणीही उपस्थित नसल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, काँग्रेस खासदार उत्तर रेड्डी यांनी ईडीच्या छाप्याला राजकीय सूड असल्याचे म्हटले आहे.
सोनिया-राहुल यांची चीकशीतपास यंत्रणेने गेल्या महिन्यातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीने 26 जुलै रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दुसऱ्यांदा चौकशी केली होती. या प्रकरणी ईडीने 21 जुलै रोजी सोनिया गांधी यांची पहिल्यांदा चौकशी केली होती. सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावल्याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात निदर्शने केली होती. यावेळी पोलिसांनी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी ईडीने राहुल गांधी यांचीही दीर्घकाळ चौकशी केली आहे. नॅशनल हेराल्डचे सर्व काम मोतीलाल व्होरा पाहत असल्याचे राहुल गांधींनी ईडीला सांगितले.