ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - नॅशनल हेराल्ड प्रकरणी मोदी सरकार सूडाचे राजकारण करत आहे, मात्र आम्ही दबणार नाही, झुकणार नाही असा स्पष्ट निर्धार काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केला. राजकीय सूडापोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडून आरोप करण्यात आले आहेत, पण काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी हे नेहमी सत्याच्या मार्गावरच चालले आहेत, सत्याचाच विजय होईल असेही ते म्हणाले.
नॅशनल हेराल्डप्रकरणाच्या सुनावणीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे अन्य तीन नेते आज शनिवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयासमोर हजर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सूरजेवाला बोलत होते. सोनियाजी व राहुल हे नेहमीच सत्याच्या मार्गावर चालले आहेत, नेहमी सत्याचा विजय होतो आणि आजही सत्य काय ते उघड होईल. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, न्यायासाठी आम्ही लढू असे सांगत या प्रकरणात गृहमंत्र्यांपासून व्यंकय्या नायडूंपर्यंत सर्व मंत्र्यांकडून चुकीचे आरोप करण्यात येत आहेत असे सांगत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरूनच काँग्रेसविरोधात हे षडयंत्र रचण्यात आले असून सूडापोटीच सोनिया गांधी व राहुल गांधी यांना या प्रकरणात गोवले जात आहे, असा आरोप काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केला. या प्रकरणासाठी सुब्रमण्यम स्वामी यांना केंद्र सरकारने बक्षीस म्हणून झेड दर्जाची सुरक्षा दिली असून स्वामी हे मोदींचा मुखवटा आहेत, मोदींच्या इशा-यावरूनच या सर्व गोष्टी घडत आहेत, असेही आझाद म्हणाले. मात्र आम्ही कोणालाही घाबरत नाही, आमच न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आम्हाला न्याय मिळेलच असा विश्वास आझाद यांनी व्यक्त केला
नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी आज दुपारी तीनच्या सुमारास सुरू होण्याची शक्यता असून सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे न्यायालयात हजर राहणार असल्यामुळे पटियाला हाऊस न्यायालय परिसरातील सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्यांच्या समर्थनासाठी देशभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र न्यायालयीन प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना न्यायालयात न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रॉबर्ट वड्रा यांनी दर्शवला सोनिया, राहुल यांना पाठिंबा
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत जमलेले असतानाचा सोनिया गांधी यांचे जावई व प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी सोनिया व राहुल यांना पाठिंबा दर्शवला आहे. सध्या सूडाचे राजकारण आणि दुर्भावनेतून बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. सत्य काय आहे ते लवकरच समोर येईल, असे वड्रा यांनी म्हटले आहे.