रायपूर - प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेक ठिकाणी प्लास्टिकबंदी करण्यात आली आहे. पर्यावरणाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी छत्तीसगडमध्ये एक अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. अंबिकापूर महानगर पालिकेने प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यात नागरिकांना मोफत जेवण देण्याचा चांगला उपक्रम राबवला आहे. छत्तीसगडमध्ये भारतातील पहिला Garbage Cafe तयार करण्यात आला आहे. एक किलो प्लास्टिकच्या मोबदल्यात लोकांना मोफत जेवण मिळणार आहे. यामुळे शहर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या अंबिकापूर महानगर पालिकेच्या वतीने गार्बेज कॅफे सुरू करण्यात आला आहे. शहर स्वच्छ व सुंदर राहावे तसेच प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. एक किलो प्लास्टिक गोळा करून आणले तर त्या मोबदल्यात नागरिकांना मोफत जेवण मिळणार आहे. तसेच 500 ग्रॅम प्लास्टिक कचरा आणणाऱ्या लोकांना या कॅफेमध्ये नाष्टा देण्यात येणार आहे.
महापौर अजय तिरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबिका महानगर पालिकेच्या गार्बेज कॅफेमध्ये प्लास्टिकचा कचरा जमा करायचा आहे. रस्त्यावर प्लास्टिकचा कचरा फेकण्यात येतो. यामुळे परिसर अस्वच्छ होतो आणि पर्यावरणाचे नुकसान होते. 1 किलो प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यात जेवण तर अर्धा किलो प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यात नाश्ता मिळणार आहे. गार्बेज कॅफेमध्ये जमा करण्यात आलेल्या प्लास्टिक कचऱ्याचा वापर हा रस्ता तयार करण्यासाठी वापरण्यात येत आहे. गार्बेज कॅफेमध्ये नागरिकांना मोफत जेवण मिळणार असल्याने सर्वत्र या कॅफेचं कौतुक होत आहे.