नवी दिल्ली : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी पुढील वर्षी नवे सर्वंकष राष्ट्रीय धोरण आणण्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरणमंत्री थावरचंद गहलोत यांनी गुरुवारी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात केली.ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याण योजनांना गती देण्याची गरज आहे. लवकरच नवे राष्ट्रीय धोरण अवलंबले जाईल. समाजाने वृद्धांकडे लक्ष देण्याची आवश्यकता लक्षात घेता नवे धोरण त्या दिशेने ठोस पाऊल टाकणारे ठरेल. समाजातील बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमुळे नव्या राष्ट्रीय धोरणाची गरज प्रतिपादित करताना त्यांनी वृद्धांना अधिक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. सरकारने याआधीच स्वयंसेवी संस्था आणि अन्य घटकांकडून सूचना आणि शिफारशी मागितल्या आहेत. कोणतेही धोरण निश्चित करताना जनतेचा सहभाग हवा. अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविता यावा यासाठी आम्ही या धोरणातही जनतेच्या सहभागावर भर देणार आहोत. १९९९ मध्ये अवलंबण्यात आलेल्या राष्ट्रीय धोरणाची जागा नव्या सर्वसमावेशक धोरणाने घेतलेली असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ज्येष्ठ नागरिकांसाठी पुढील वर्षी राष्ट्रीय धोरण
By admin | Published: October 01, 2015 10:26 PM