नवी दिल्ली : विशेष दर्जा देणारे कमल 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालजम्मू-काश्मीरमधील जनता, पोलीस आणि लष्काराच्या जवानांसोबत चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेताना दिसत आहेत.
शनिवारी अजित डोवाल यांनी अनंतनाग येथील स्थानिक नागरिकांसोबत चर्चा केली. तसेच, याठिकाणी बकरी ईदसाठी मेंढी विकण्यासाठी आलेल्या मेंढपाळांशी सुद्धा अजित डोवाल यांनी संवाद साधला. विशेष, म्हणजे दोन दिवसांपूर्वी अजित डोवाल हे जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथे गेले होते. यावेळीही त्यांनी लोकांशी चर्चा करुन त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादही घेतला होता.
दरम्यान, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून अजित डोवाल जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. याआधी गेल्या महिन्यात अजित डोवाल जम्मू-काश्मीरला गेले होते. त्यानंतर अजित डोवाल दिल्लीला परतल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या म्हणजे 10 हजार भारतीय जवान तैनात करण्यात आले. त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सांगण्यात आले. मात्र, काही दिवसानंतर केंद्र सरकारकडून जम्मू काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटविण्यात आले.
('370 रद्द' होताच अजित डोवाल काश्मीरमध्ये; जनतेशी बोलले, एकत्रच जेवले!)
कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असता येथील अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे. कलम 370 रद्द करण्याआधी केंद्र सरकारने येथील परिस्थिती चिघळण्याची चिन्हे लक्षात काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली होती. मात्र, आज जम्मू-काश्मीरमधील काही भागात संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. तसेच, सध्या काश्मीरमधील जनजीनन सुरुळीत असून एटीएम, दुकाने सुरु आहेत. तर, आजपासून शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत.