काँग्रेसच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 08:20 AM2019-04-01T08:20:37+5:302019-04-01T08:21:12+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर ही माहिती देताना लिहिले की, लेफ्ट. जनरल (निवृत्त) डी.एस. हूडा व त्यांच्या टीमने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीचा एक सर्वंकष अहवाल तयार करून माझ्याकडे सुपूर्द केला आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेत आल्यास त्यांचे राष्ट्रीय सुरक्षाविषयक धोरण काय असेल याचा एक सर्वंकष मसुदा तयार झाला असून लवकरच पक्ष आपल्या निवडणूक जाहिरनाम्याच्या भाग म्हणून हे धोरण देशाच्या नागरिकांपुढे सादर करेल. विशेष म्हणजे सन २०१६ मध्ये पाकिस्तानवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चा मोदी सरकार डंका पिटते त्या धाडसी मोहिमेचे ज्यांनी नेतृत्व केले होते ते भारतीय लष्कराचे निवृत्त लेप्ट. जनरल डी.एस. हूडा यांनी काँग्रेससाठी ही ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या वेळी लेफ्ट. जनरल हूडा लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख होते.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर ही माहिती देताना लिहिले की, लेफ्ट. जनरल (निवृत्त) डी.एस. हूडा व त्यांच्या टीमने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीचा एक सर्वंकष अहवाल तयार करून माझ्याकडे सुपूर्द केला आहे. या अहवालावर आधी काँग्रेस पक्षात सविस्तर चर्चा केली जाईल. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रीय सुरक्षा हा एक महत्वाचा मुद्दा ठरू पाहात आहे. काँग्रेसने केवळ एका घराण्याचे हित जपण्यासाठी देशाची सुरक्षा वाऱ्यावर सोडली. देशाच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची धमक त्यांच्यात नाही, असा आरोप करत देशाची सुरक्षा फक्त मोदींच्याच हाती सुरक्षित राहू शकते, असा दावा भाजप करत आहे. तर दुसरीकडे भारतीय सैन्यदलांच्या शौर्याचे भाजपा राजकीय भांडवल करत असल्याचा प्रतिहल्ला काँग्रेसकडून केला जात आहे.