अहमदाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडियामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. जे युद्ध जिंकू शकत नाहीत, ते आमच्या एकतेत फूट टाकतायत, असं म्हणत मोदींनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. मी आज राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्तानं प्रत्येक देशवासीयाला देशासमोर असलेल्या आव्हानांची आठवण करून देऊ इच्छितो. जे आपल्याशी युद्धात जिंकू शकत नाहीत, ते आपल्या एकतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.पण ते एक गोष्ट विसरतात, एवढ्या वर्षांपासून प्रयत्न करून ते आम्हाला नेस्तनाबूत करू शकलेले नाहीत. आमच्या एकतेला हरवू शकलेले नाहीत. आमच्याकडे विविधतेतच एकता असते. सरदार साहेबांच्या आशीर्वादानं अशा शक्तींना पराभूत करण्याचा मोठा निर्णय देशानं काही आठवड्यांपूर्वीच घेतला. कलम 370नं जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटिरतावाद पसरविण्याशिवाय काहीही केलेलं नाही. पूर्ण देशात फक्त जम्मू-काश्मीरमध्येच कलम 370 लागू होतं.जम्मू-काश्मीरमध्ये तीन दशकांत जवळपास 40 हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे. दशकांपासून भारतीयांसाठी कलम 370ही एक भिंत बनलेली होती. या भिंतीमुळेच जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद आणि दहशतवाद वाढत होता. आता ती भिंतच पाडण्यात आली आहे. पटेलांकडे काश्मीर प्रश्न असता तर तो सोडवण्यास एवढा वेळ लागला नसता. कलम 370 हटवण्याचा निर्णय मी जयंतीनिमित्त पटेलांना समर्पित करतो, असंही मोदी म्हणाले आहेत.
जे युद्धात जिंकू शकत नाहीत, ते आमच्या एकतेमध्ये फूट टाकतायत, मोदींचा पाकवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 11:27 AM