नवी दिल्ली: देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी नवी दिल्लीत उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं उद्धाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. यावेळी पंतप्रधानांनी देशावर आलेल्या संकटांचा निधड्या छातीनं सामना करणाऱ्या जवानांचं कौतुक केलं. देशावरील संकटांवेळी जवानांनी कायम स्वत:च्या छातीचा कोट केला आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं, असंदेखील यावेळी मोदी म्हणाले. इंडिया गेटजवळ राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्यात आलं आहे. जवळपास 40 एकर परिसरात हे स्मारक उभारण्यात आलं आहे. देशासाठी लढलेल्या जवानांची शौर्य गाथा या ठिकाणी ऐकता येईल. यासाठी 176 कोटी रुपये खर्च आला आहे. 1947 पासून देशासाठी शहीद झालेल्या 25 हजारांहून अधिक जवानांची नावं या ठिकाणी आहेत. या वास्तूच्या मध्यभागी 15 मीटर उंचीचा स्तंभ आहे. या ठिकाणी परमवीर चक्रानं गौरव करण्यात आलेल्या 21 जवानांच्या मूर्ती आहेत.
शहिदांच्या स्मृती जपणारं राष्ट्रीय युद्ध स्मारक आतून कसं दिसतं? पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 11:08 PM