नवी दिल्ली : जेएनयूतील वाद आणि पतियाळा हाऊस कोर्टातील हिंसाचाराबाबत काँग्रेसने गुरुवारी आक्रमक भूमिका अवलंबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. कायदा नावालाही उरलेला नसून लोकशाहीचे हक्क दडपले जात आहेत, असे स्पष्ट करतानाच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. भाजपने देशविरोधी संबोधल्याबद्दल राष्ट्रवाद माझ्या रक्तातच वाहतो आहे. माझ्या कुटुंबाने या देशासाठी वारंवार दिलेले बलिदान मी बघत आलो आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले.शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त करणे आणि विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती दडपणे हे सरकारचे काम नाही. रा.स्व. संघाने देशभरातील विद्यार्थ्यांवर सदोष विचारपद्धती लादण्याचा प्रयत्न चालविला आहे. देश गंभीर संकटात सापडला आहे. देशाच्या राजधानीच्या हृदयस्थानी असलेल्या न्यायालयाच्या परिसरात कायदा उरला नसल्याचे चित्र दिसते. देशाची लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत, असे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात नमूद केले. उत्तर प्रदेशात काळे झेंडेकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी लखनौ येथे दलित संमेलनासाठी आले असता भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत त्यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)राहुल गांधी यांनी देशविरोधी घटकांना समर्थन दिले असून त्याविरोधात आम्ही आरटीओ कार्यालयाजवळ निदर्शने केली, असे भाजयुमोचे सरचिटणीस अभिजित मिश्रा यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे वृत्त आहे. भाजयुमोच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिश्रा यांनी दिली, मात्र नेमक्या किती जणांवर कारवाई करण्यात आली ते सांगण्याचे टाळले. (वृत्तसंस्था)
माझ्या रक्तातच वाहतो राष्ट्रवाद -राहुल गांधी
By admin | Published: February 19, 2016 3:13 AM