यदु जोशी, मुंबईशिवसेना-भाजपा युतीच्या घटस्फोटाचा मुहूर्त साधून राष्ट्रवादीने काँग्रेससोबतच्या आघाडीचा काडीमोड करत वर्तमान राजकीय परिस्थितीचा लाभ उठविण्याचा नेमका डाव साधला. जागा वाटपाच्या बोलणीत काँग्रेसला गुंतवून महायुतीतील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपला हुकमी डाव साधला.१९९९ पासून महाराष्ट्राच्या सत्तेचा गाडा एकत्रितपणे हाकणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संबंध नेहमीच ताणलेले राहिले. विशेषत: गेल्या पाच वर्षांत याची अनेकदा प्रचिती आली. एकमेकांवर कुरघोडी करण्याची कुठलीही संधी दोघांनीही सोडली नाही, याचा वारंवार अनुभव आला. हे दोन्ही पक्ष आज एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी दोघांमध्ये सातत्याने कुरबुरी सुरू राहिल्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जलसंपदा विभागातील घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीकडे असलेल्या या विभागाला चाप लावला. तेथे आयएएस दर्जाचे सचिव नेमले. दहा वर्षांत केवळ ०.०१ टक्केच सिंचन वाढल्याची चौकशी लावली. श्वेतपत्रिका काढून दाखविली. या घोटाळयांच्या चक्रात उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे अडकले, त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घोटाळे अशी नकारात्मक प्रतिमा उभी राहिली. राज्य सहकारी बँकेतील राष्ट्रवादीच्या मनमानीला मुख्यमंत्री चव्हाण यांनी चाप लावला. तेथे प्रशासक नेमण्यात आले. बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेने पुन्हा एकदा राष्ट्रवादीला आरोपीच्या ंिपंजऱ्यात नेऊन बसविले. जलसंपदा आणि राज्य बँकेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्याचे चित्र निर्माण झाले. राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर मुख्यमंत्री चव्हाण आणि गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आणि त्यातून या बदल्या वर्षभर रखडल्या. महिला बालकल्याण विभागाची सुकन्या योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील वित्त विभागात अडली. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला बाल कल्याण मंत्री काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. शेवटी मुश्किलीने योजना मार्गी लागली. आघाडीचे सरकार असताना ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद असते त्याच पक्षाकडे वित्त आणि गृह ही दोन अत्यंत महत्त्वाची खाती असली पाहिजेत, अशी भावना मुख्यमंत्री चव्हाण यांनी अनेकदा पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना व्यक्त केली होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्याला पारदर्शक कारभाराची हमी दिली. तर आम्ही गतिमान कारभाराची हमी दिली आहे, असे राष्ट्रवादीचे नेते सांगत.
राष्ट्रवादी काँंग्रेसने अखेर साधला डाव
By admin | Published: September 26, 2014 2:35 AM