नवी दिल्ली, दि. 28 - केंद्रीय मंत्रिमंडळात येत्या आठवड्यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष एनडीए सरकारमध्ये सहभागी होत असल्याच्या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळात फेरबदल केले जात असल्याची माहिती मिळत आहे. टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, पाच राज्यमंत्र्यांना बढती मिळणार आहे. सोबतच जेडीयू आणि राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात जागा मिळण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळू शकते असा दावा टाईम्स नाऊने केला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण शरद पवारांचा हात पकडून राजकारणात आल्याचं वक्तव्य याआधी केलेलं होतं.
सुप्रिया सुळेंकडून खंडन -एकीकडे राष्ट्रवादी एनडीएत सहभागी होत असल्याची माहिती मिळत असताना खासदार सुप्रिया सुळे यांना मात्र ही अफवा असल्याचं सांगत वृत्ताचं खंडन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शपथ घेणार असल्याच्या अफवा उठवल्या जात आहेत, यात कोणतंही तथ्य नाही, असं सुप्रिया सुळे एबीपी न्यूजशी बोलल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून अशा अफवा पसरवल्या जात आहेत, पण या अफवा कोण पसरवतं, हे उद्योग नेमकं कोण करतं, हे कळत नसल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही ही अफवा असल्याचे सांगणारे ट्विट केले आहे.
नितीश कुमार यांना भाजपासोबत आल्याचं बक्षीस दिलं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला असल्याने त्यांच्याजागी दुस-या कोणाला संधी दिली जाऊ शकते का हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.
सुरेश प्रभूंनी सादर केला राजीनामा आणि चर्चेला आले उधाणचार दिवसांत झालेल्या दोन रेल्वे अपघातांची जबाबदारी स्वीकारत, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देऊ केला. मात्र, त्यांनी राजीनामा स्वीकारला नसून, प्रभू यांना ‘थांबा’ असा सल्ला दिला आहे.
उत्तर प्रदेशात १९ ऑगस्ट रोजी उत्कल एक्स्प्रेस रुळांवरून घसरून २३ जण ठार व ४00 लोक जखमी झाले. त्यानंतर, बुधवारी पुन्हा उत्तर प्रदेशातच कैफियत एक्स्प्रेसच्या अपघातात ७0 हून अधिक प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी राजीनामा दिला.
त्यानंतर, काही तासांनी सुरेश प्रभू यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यांनीही राजीनामाही सादर केला. मात्र, तो न स्वीकारता मोदी यांनी त्यांना थांबण्यास सांगितले आहे. स्वत: सुरेश प्रभू यांनीच टिष्ट्वटरवरून ही माहिती दिली. ते म्हणाले की, 'या अपघातांमुळे आपण अतिशय दु:खी आहोत. जखमी झालेल्यांचे, तसेच मृतांच्या नातेवाईकांचे दु:ख पाहून मला त्रास झाला आहे. अपघात टळावेत व जनतेला चांगली रेल्वेसेवा मिळावी, यासाठी मी घाम गाळला व रक्त आटवले. रेल्वेत सुधारणेसाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पावले टाकली. मात्र, अपघातांची जबाबदारी स्वकारून मी राजीनामा सादर केला आहे.'
या घटनेनंतर मंत्रिमंडळाच्या फेररचनेच्या चर्चेला उधाण आलं असून टाइम्स नाऊच्या दाव्यानुसार शरद पवारांची राष्ट्रवादी रालोआमध्ये सामील होऊ शकते आणि पवारांना मंत्रीपद मिळू शकते.