हरीश गुप्ता नवी दिल्ली : राजकारणातील बदलत्या आश्चर्यजनक घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने असे संकेत दिले आहेत की, ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करण्यात अडथळा आणणार नाहीत. ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करून घेण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न करणाऱ्या भाजपसाठी हा मोठा आधार ठरणार आहे. राष्ट्रवादी हा काँग्रेसचा सहकारी पक्ष असून लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ते काँग्रेससोबत आघाडीनेच लढतात. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले की, या विधेयकासाठी पक्ष मत देऊ शकत नाही. पण, एक गोष्ट स्पष्ट आहे की, आम्ही या विधेयकाविरुद्ध मत देणार नाही.
राष्ट्रवादीची ही भूमिका भाजपसाठी सोयीची ठरणार आहे. २४० सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे ७८ सदस्य आहेत. एनडीएचे ९७ खासदार आहेत. यात ३ नियुक्त आणि ४ अपक्ष सदस्यांचा समावेश आहे. यात जनता दल यूनायटेडच्या त्या ६ सदस्यांचा समावेश नाही ज्यांचा या विधेयकाला विरोध आहे. अण्णाद्रमुक आणि बिजू जनता दल यांनी या विधेयकाला सहकार्य करण्याचे संकेत दिले आहेत. या दोन पक्षांचे २० सदस्य आहेत. यामुळे भाजप जनता दल यूनायटेडशिवाय ११७ पर्यंत पोहचणार आहे.
आकडे काय सांगतात?उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, वायएसआर काँग्रेस (२), पीडीपी (२) आणि जेडीएस (१) हेही आपापल्या राज्यातील परिस्थितीमुळे तटस्थ राहतील. राष्ट्रवादीच्या ४ खासदारांसह ९ सदस्य तटस्थ राहिल्याने सभागृहातील संख्याबळ २३१ वर येईल.
भाजपला २३१ पैकी ११७ सदस्यांचे समर्थन आहे. त्यामुळे हे विधेयक कोणत्याही अडचणीशिवाय मंजूर होऊ शकते. संसदेचे अधिवेशन तीन दिवसांनी वाढविण्याचा सरकारचा विचार आहे. कारण, सरकारला कुठल्याही परिस्थितीत ट्रिपल तलाक विधेयक याच अधिवेशनात मंजूर करून घ्यायचे आहे.