नवी दिल्ली : देशाच्या इतिहासावर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी मंगळवारी (दि.९) सांगितले. तसेच, ज्या लोकांना आपल्या इतिहासाची समान जाणीव असते आणि त्यांच्या भविष्याची समान दृष्टी असते, ते लोक राष्ट्र निर्माण करतात, असेही अजित डोवाल म्हणाले.
प्राचीन भारत आणि इतिहासाचे विविध टप्पे आणि त्यातील उपलब्धी या 11 अंकांच्या पुस्तक मालिकेचे प्रकाशन मंगळवारी दिल्लीत करण्यात आले. यावेळी अजित डोवाल बोलत होते. अजित डोवाल म्हणाले, "आमच्या इतिहासावर कोणीही प्रश्न विचारू शकत नाही. यावर टीकाकारही काही बोलू शकत नाहीत. याचे कारण प्राचीन आहे. हे सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. दुसरे म्हणजे त्याचे सातत्य आहे आणि तिसरा म्हणजे त्याचा अफाट विस्तार आहे."
प्रकाशन सोहळ्याला संबोधित करताना अजित डोवाल म्हणाले, "ज्यांच्या इतिहासाची जाणीव वेगळी आहे की माझा नायक तुमचा खलनायक आहे, तर तुम्ही आणि मी राष्ट्र निर्माण करू शकत नाही." तसेच, या पुस्तकात विद्वानांच्या मोठ्या समुहाचे अभ्यासनिबंध असल्याचे अजित डोवाल यांनी सांगितले. दरम्यान, विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन (VIF) आणि आर्यन बुक्सद्वारे प्रकाशित प्राचीन भारत का इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.