लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो - ३ च्या कारशेडच्या कामाला आरेमध्ये सुरुवात करता यावी म्हणून राज्य सरकारने आरेमधील कामावरील बंदी उठविली असतानाच दुसरीकडे रविवारी याविरोधात देशव्यापी निदर्शने करण्यात आली. आरेतील पिकनिक पॉइंट परिसरात सकाळी कारशेडविरोधात पर्यावरणवादी एकत्र आले. या आंदोलनाला हैदराबाद, आदिलाबाद, आग्रा, गुडगांव, ग्रेटर नोएडा, पाटणा, जम्मू, चंडीगड आणि उज्जैन येथे पाठिंबा दर्शविण्यात आला.
आरे वाचविण्यासाठी रविवारी नऊ राज्यांत १३ ठिकाणी देशव्यापी निदर्शने करण्यात आली. आरेतील मेट्रो-३ कारशेडच्या उभारणीवरील स्थगिती शिंदे-फडणवीस सरकारने उठविल्यानंतर देशाच्या काेनाकोपऱ्यातून याला तीव्र विरोध होत आहे. देशाच्या विविध राज्यांतील शहरांमधील तरुण पर्यावरणप्रेमींच्या समूहांकडून आणि नागरिकांकडून सर्वत्र निदर्शने केली जात आहेत. सहभागी समूहांनी देशाच्या विविध भागांमध्ये शांततापूर्ण मार्गाने निषेध व्यक्त केला. आंदोलकांनी विविध माहितीपूर्ण भित्तिपत्रकांच्या माध्यमातून आरेतील हरितपट्टा आणि तेथील जैवविविधतेविषयी जनजागृती केली. आरेतील मेट्रो-३ कारशेडचे बांधकाम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्याचे आणि कारशेड पर्यायी जागेवर हलवण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलक काय म्हणतात ?जर आरेतील जंगलाचा बळी देऊन मेट्रो-३ कारशेड उभारण्याच्या निर्णयावर सरकार ठाम असेल, तर त्याविरोधात जनक्षोभ वाढतच जाईल.
सर्वोच्च न्यायालयाने आरेतील वृक्षतोडीवर स्थगिती आणली आहे आणि तरीही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश झुगारून सरकारने आरेमध्ये मेट्रो-३ कारशेडच्या बांधकामाला सुरुवात केली तर तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान तर ठरेल, शिवाय त्यामुळे जंगलाचा नाश होईल. नुकतेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार आरेचे जंगल हे पाच बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. त्यामुळे सरकारने कारशेडच्या उभारणीकरिता पर्यायी जागेचा विचार करावा. जेणेकरून या वन्यजिवांचा आणि आदिवासींचा अधिवास अबाधित राहील.- अमृता भट्टाचार्जी, सदस्या, आरे संवर्धन समूह