Natural disasters in India: गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये महापूर आला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सारख्या राज्यांमध्ये ओसंडून वाहणाऱ्या नद्यांचा अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. SBIच्या इकोरॅप संशोधन अहवालानुसार, पुरामुळे 10,000-15,000 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
सध्या आलेल्या पुरामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा अंदाज बांधणे अद्याप बाकी आहे, असेही अहवालात म्हटले आहे. रिपोर्टनुसार, एकूण नुकसान 10,000-15,000 कोटी रुपयांच्या घरात जाऊ शकते. 1990 पासून अमेरिका आणि चीननंतर भारताने सर्वाधिक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे. 2001-2022 पर्यंत भारतात 361 नैसर्गिक आपत्तींची नोंद झाली आहे.
आपत्तींमुळे आर्थिक ताणनैसर्गिक आपत्तींनी आर्थिक नुकसानीचे नवे विक्रम प्रस्थापित केल्याचे अहवालात म्हटले आहे. पूर ही भारतातील सर्वात सामान्य नैसर्गिक आपत्ती आहे. सुमारे 41 टक्के नैसर्गिक आपत्ती या पूर आणि वादळाच्या स्वरुपात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. एसबीआयच्या अहवालात असेही म्हटले आहे की, भारतात सुरक्षेची मोठी तफावत आहे. 2022 मध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे जागतिक स्तरावर $ 275 अब्जच्या एकूण आर्थिक नुकसानीपैकी $ 125 अब्ज विम्याद्वारे कव्हर केले गेले.
विमा क्षेत्राशी निगडीत नैसर्गिक आपत्तीच्या जोखमीसाठी 'आपत्ती पूल'च्या गरजेवर अहवालात भर देण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, 2020 मध्ये भारतातील पुराच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास एकूण आर्थिक नुकसान $ 7.5 अब्ज (52,500 कोटी रुपये) होते. परंतु विमा संरक्षण केवळ 11 टक्के झाले. भारताला नैसर्गिक आपत्तींसाठी 'आउट-ऑफ-द-बॉक्स सोल्युशन्स' आणि सुरक्षेच्या अंतरांबाबत व्यवसायांमध्ये जागरूकता आवश्यक आहे. एमएसएमई क्षेत्रात देशातील फक्त पाच टक्के युनिट्सचा विमा उतरवला जातो. या भागाला अत्यंत उच्च पातळीच्या सुरक्षेची गरज आहे.