नवी दिल्ली - आईस्क्रिम हे सर्वांच्याच आवडीचं. स्टॉबेरी, व्हॅनिला, मँगो, च़ॉकलेटसारखे फ्लेव्हर्स पाहिल्यावर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. फळांपासून तयार केलेलं आईस्क्रिम तर सर्वात बेस्ट असतं. एका फळविक्रेत्याच्या मुलाने फळांपासून आईस्क्रिम तयार केलं आणि ते देशभरात आता प्रचंड लोकप्रिय झालं आहे. तब्बल 300 कोटींचा व्यवसाय सध्या उभा केला आहे. रघुनंदन एस कामथ यांनी ही कमाल केली आहे. "नॅचरल्स आईस्क्रिम"च्या माध्यमातून त्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अगदी छोट्या स्वरूपात सुरू केलेल्या व्यवसायाची आता कोट्यवधींची उलाढाल आहे. यातून नवीन काहीतरी करू पाहणाऱ्या तरुणांना तसेच व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्यांना प्रेरणा मिळत आहे.
मुंबईत सुरुवातीला स्वत:चं आईस्क्रिमचं छोटंस एक दुकान चालवणाऱ्या रघुनंदन यांनी "आईस्क्रिम मॅन" म्हणून स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नॅचरल आईस्क्रिम (Natural Icecream) नावाची अत्यंत प्रसिद्ध कंपनी स्वकष्टाने उभी केली आहे. याच देशाच्या कानाकोपऱ्यात या कंपनीचे आईस्क्रिम पार्लर आहेत. कंपनीची वार्षिक उलाढाल तब्बल 300 कोटी आहे. आज देशभरात नॅचरल्स आईस्क्रिमचे 135 हून अधिक आउटलेट्स आहेत. ज्यामध्ये 20 हून अधिक फ्लेवर्सचे आईस्क्रिम उपलब्ध आहेत. रघुनंदन यांचा जन्म कर्नाटकातील पुत्तूर तालुक्यातील मुलकी नावाच्या छोट्या गावात झाला. वडील फळांची लागवड करीत असत आणि फळांची विक्री करून कुटुंबाचं पोट भरत असतं.
The Better India च्या रिपोर्टनुसार, रघुनंदन हे सात भावंडांपैकी सर्वात लहान होते. 1966 मध्ये रघुनंदन आपल्या भावांकडे मुंबईत राहायला आले. तिथे ते इडली-डोसा असा एक फूड स़्टॉल चालवायचे त्यासोबत आईस्क्रिम सुद्धा देत असत. पण तेव्हा आईस्क्रिम हा त्यांच्या व्यवसायाचा एक छोटासा भाग होता. मात्र त्यांना आईस्क्रिममध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करायची होती. 1983 मध्ये त्यांचे लग्न झाले आणि नंतर त्यांनी आईस्क्रिम व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. पण त्यावेळी बाजारात अनेक प्रसिद्ध ब्रँड उपलब्ध होते. अशावेळी रघुनंदन यांनी रिस्क घेण्याचा विचार करून फक्त आईस्क्रिमसाठी काम सुरू केलं.
14 फेब्रुवारी 1984 मध्ये रघुनंदन यांनी मुंबईमध्ये Naturals Ice Cream, Mumbai नावाने पहिलं आऊटलेट सुरू केलं. त्यांनी यासाठी जुहू हे ठिकाण निवडलं कारण तिथे मोठी मोठी मंडळी राहत होती. पण फक्त आईस्क्रिम खाण्यासाठी लोक सुरुवातीला येत नव्हते. त्यामुळे त्यांनी पाव भाजीही विकायला सुरुवात केली. गरम गरम मसालेदार पाव भाजीनंतर लोकांना थंड आणि गोड पदार्थ म्हणून आईस्क्रिम सर्व्ह करत असे. रघुनंदन यांन फळं, दूध आणि साखरेपासून आईस्क्रीम तयार केलं. आंबा, चॉकलेट, सीताफळ आणि स्ट्रॉबेरी असे फ्लेव्हर्स हे सुरुवातीला लॉन्च करण्यात आले.
रघुनंदन यांनी आपलं प्रोडक्ट सुपर स्पेशल करण्याकडे अधिक लक्ष केंद्रीत केलं. अनेक सेलिब्रिटी हे त्यांचे ग्राहक होते. ते वेगवेगळ्या देशांमध्ये फिरून आले होते. त्यामुळेच त्यांनी त्यांच्याकडून फीडबॅक आणि सल्ला घेण्यास सुरुवात केली. फळांपासून आईस्क्रिम तयार करणं ही प्रक्रिया सोपी नव्हती. त्यांनी स्वत: फळांवर प्रक्रिया करण्यासाठी खास मशीन्स तयार केली. आपल्या गरजेनुसार डिझाईन आणि तयार केले. मशीनच्या मदतीने काम जलद होऊ लागले. त्यामुळे उत्पादन वाढू लागले आणि त्यामुळे व्यवसायही वाढला. हळूहळू फ्रँचायजीच्या माध्यमातून कंपनीची आउटलेटही वाढू लागली. काही दुकान रघुनंदन कामथ यांच्या देखरेखीखाली सुरू आहेत तर बहुतेक फ्रेंचायजी म्हणून कार्यरत आहेत. देशभरात नॅचरल्स आईस्क्रिमचे 135 हून अधिक आउटलेट्स आहेत.