ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 17 - चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर देशातील सामान्य नागरिकांसह विदेशातून आलेल्या पर्यटकांची सुद्धा चांगलीच तारांबळ उडताना दिसत आहे.
भारतात आलेल्या विदेशी पर्यटकांना त्यांच्या देशातील चलनाचे भारतीय चलन रुपयात बदल करताना अनेक अडचणी येत आहेत. विशेषकरुन, विदेशातून भारतातील हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आलेल्या नागरिकांना ट्रॅव्हल एजन्ट किंवा विदेशी चलन विनिमय केंद्रावर अवलंबून रहावे लागत आहे.
ट्रॅव्हल एजन्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे अनिल पंजाबी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबरला चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विदेशी पर्यटकांचे 9 नोव्हेंबरपासून सतत फोन येत आहेत. जास्तकरुन अनेकजण सद्दस्थितीबाबत तक्रार करत आहेत. विदेशी चलन विनिमय केंद्राजवळ सुद्धा त्यांना बदलता येईल तेवढी कॅश उपलब्ध नाही त्यामुळे अडचणी येत आहेत. तसेच, त्यांच्याकडे येथील आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वोटर कार्ड नसल्यामुळे त्यांनी चलन बदलण्यासाठी बॅंकेत सुद्धा जाता येत नाही.
गेल्या काही दिवसापूर्वी एका विदेशी पर्यटकाचा मला फोन आला होता. त्याने सांगितले की, आमच्याजवळ कॅश नसून आमच्या मुलाला दूध विकत घेण्यासाठी सुद्धा पैशे नाहीत, असे अनिल पंजाबी म्हणाले.