कोची - कोची येथे हनीमूनसाठी गेलेल्या अहमदनगर येथील बॅंक मॅनेजरचा जीव भारतीय नौदलातील अधिकाऱ्याने वाचवला आहे. कोचीमध्ये भारतीय नौदलातील अधिकाऱ्याने वायपीन समुद्रावर बुडत असलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचवलेत. या अधिकाऱ्याने वेळीच समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला सीपीआर दिल्याने त्या व्यक्तीचे प्राण वाचण्यास मदत झालीये.
बॅंक ऑफ बरोदाचे मॅनेजर दिलीप कुमार असं या व्यक्तीचे नाव आहे. दिलीप कुमार आणि त्यांच्या पत्नी राजकुमारी हे केरळ येथे हनीमूनसाठी गेले होते. 8 महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं आहे. शुक्रवारी दिलीप कुमार आणि त्यांच्या पत्नी कोची येथे फिरण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली. दुपारी 3.30 च्या सुमारास दिलीप कुमार वायपीन समुद्र किनारी आनंद लुटत असताना अचानक आलेल्या लाटेत ते समुद्रात बुडू लागले. त्यावेळी नौदल अधिकारी राहुल दलाल यांनी प्रसंगावधान राखून दिलीप कुमार यांचा जीव वाचवला.
औरंगाबादला राहणारे दिलीप कुमार हे कोचीजवळ असलेल्या वायपीन समुद्रात पाण्यामध्ये बुडत असल्याचं राहुल दलाल यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी तातडीने राहुल दलाल यांनी समुद्रात उडी घेऊन दिलीप कुमार यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावले. इतकचं नाही तर दिलीप कुमार यांना पाण्यातून त्यांनी बाहेर काढत समुद्र किनाऱ्यावर आणले. त्यावेळी दिलीप कुमार बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांचा श्वास बंद झाला होता अशावेळी नौदल अधिकारी राहुल दलाल यांनी दिलीप कुमार यांना सीपीआर उपचार देत त्यांचे प्राण वाचवले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे. तसेच लेफ्टनंट जनरल राहुल दलाल यांचा भारतीय नौदलाला अभिमान असल्याचं सांगितले आहे.