ऑनलाइन लोकमत
जमशेदपूर, दि. 10 - पश्चिम बंगालच्या सिंगभूम जिल्ह्यातील बादीया गावात एकाचवेळी दोन सामाजिक हेतू साध्य करणारा अनोखा विवाह संपन्न झाला. लग्न करुन नववधू ज्या घरात जाणार होती. त्या घरात शौचालय नव्हते. त्यामुळे लग्नाच्या काही तास आधी वधू आणि वर पक्षाने एकत्र येऊन सुभाष नायक या नवरदेवाच्या घरात शौचालय बांधले.
त्यानंतर एक पैशाचाही रोखीने व्यवहार न करता कॅशलेस विवाहसोहळा पार पाडला. यामध्ये उपजिल्हाधिकारी संजय कुमार यांनी महत्वाची भूमिका बजावली. चक्रधरपूरच्या इतिहासा गावात राहणा-या सुनीताचा बादीया गावच्या सुभाष नायकशी लग्न झाले. या विवाहासाठी मंडप बांधणीपासून, दागिने, जेवणावळीसाठी साहित्याची सर्व खरेदी ऑनलाइन करण्यात आली.
लग्न लावणा-या पूजा-याला दक्षिणेपासून ते आहेरात मिळालेल्या भेटवस्तू ऑनलाइन आणि चेकच्या स्वरुपात होत्या. कॅशलेस सोसायटीसाठी जे प्रयत्न सुरु आहेत. हा विवाह त्याचाच एक भाग होता. या अनोख्या कॅशलेस विवाह सोहळयात सहभागी होऊन गावक-यांनाही आनंद झाला.