ऑनलाइन लोकमत
छत्तीसगड, दि. 30 - हुंडा प्रथेमुळे अनेकांचे संसार मोडले जात असतानाही ही प्रथा अजून बंद होण्याचं नाव घेताना दिसत नाही. काही दिवसांपुर्वी लातूरमध्ये लग्न करण्यासाठी वडिलांना कर्ज मिळत नसल्याने शेतक-च्या मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. अनेकदा तरुणी या प्रथेविरोधात आवाज उठवताना दिसत नाही. मात्र छत्तीसगडमधील कोरिया येथे हुंडा मागणा-या नवरदेवाविरोधात नववधूने फक्त आवाज उठवला नाही, तर पोलिसांकडे तक्रारही केली. तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नवरदेवाला अटक केली आहे.
परिस्थिती तेव्हा बिघडू लागली जेव्हा नवरदेवाने भरमंडपात मुलीच्या कुटुंबियांकडे रेफ्रिजरेटर आणि सोन्याची चेन मागितली. मात्र त्याच्या या मागण्या मुलीच्या कुटुंबियांनी सरळपणे फेटाळून लावल्या. यानंतर त्याचा पारा चढला आणि त्याने त्यांचा अपमान करण्यास सुरुवात केली.
परिस्थिती चिघळत असल्याचं लक्षात येताच नातेवाईक आणि शेजा-यांनी रुसलेल्या नवरदेवाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या मागण्यांवर अडून बसलेला नवरदेव कोणाचंही काहीच ऐकायला तयार नव्हता.
अखेर नवरदेव आणि त्याचे कुटुंबिय नववधूला सोबत न घेताच निघून गेले. यानंतर मात्र नववधूने पोलिसांत तक्रार केली. नवरदेवाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधिकारी आनंद सोनी यांनी दिली आहे.